साक्रीत भव्य संविधान भवनासाठी रिपब्लिकन पक्षाची मागणी; नगरपंचायतीकडे जागा आरक्षित करण्याचे निवेदन

 


साक्रीत भव्य संविधान भवनासाठी रिपब्लिकन पक्षाची मागणी; नगरपंचायतीकडे जागा आरक्षित करण्याचे निवेदन

साक्री (धुळे) : साक्री शहरातील दलित समाज व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने साक्री नगरपंचायतीकडे भव्य दिव्य संविधान भवन उभारण्यासाठी जागा आरक्षित करून ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

साक्री तालुका अध्यक्ष कमलाकर वामन मोहिते यांनी मुख्याधिकारी, नगरपंचायत साक्री यांना दिलेल्या निवेदनात शहरातील वॉर्ड क्रमांक ४ मधील गट क्रमांक १८२/१ व १८२/२ या जागेवर संविधान भवन उभारण्याची मागणी केली. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून ही जागा संविधान भवनासाठी आरक्षित असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, साक्री तालुक्यात आजपर्यंत एकही संविधान भवन नसून, शहरातील बौद्ध व दलित समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वतंत्र केंद्राची गरज आहे. साक्री हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असल्याने येथे संविधान भवन उभारल्यास समाजबांधवांना मोठा लाभ होणार असल्याचे मोहिते यांनी नमूद केले.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा व धुळे येथे संविधान भवन उभारणीचे काम झाले असताना साक्री तालुका अद्याप वंचित असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनाही पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नगरपंचायतीने संबंधित जागेवर संविधान भवनासाठी तातडीने ठराव मंजूर करून सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments