खरीप हंगामापूर्वीच शिरपूरचा शेतकरी संकटात; महागडी खते, बियाणांची काळाबाजारी अन् डिझेल टंचाईचा दुहेरी फटका!
शिरपूर (प्रतिनिधी): तालुक्यात मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला असून बागायती क्षेत्रावर कापूस लागवडीलाही सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसमोर अडचणींचे डोंगर उभे ठाकले आहेत. खतांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ, व्यापाऱ्यांकडून कापूस बियाणांची चढ्या भावाने होणारी विक्री आणि बाजारातील पेट्रोल-डिझेलची टंचाई यामुळे शिरपूर तालुक्यातील शेतकरी चहूबाजूंनी होरपळला जात आहे.
: बियाणांची चढ्या भावाने विक्री अन् खतांचे वाढते भाव
यंदा कडक उन्हाळ्यामुळे तापमान जास्त असल्याने कापसाची लागवड काहीशी उशिराने होत आहे. असे असतानाही, बागायती शेती असलेल्या भागात कापूस लागवडीची लगबग सुरू आहे. याचाच गैरफायदा काही व्यापारी घेत असून, कापसाचे बियाणे चढ्या भावाने शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले जात आहे. त्यातच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने यंदा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
संकट २: डिझेल टंचाई आणि ट्रॅक्टर भाड्यात वाढ
शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असतानाच सध्या तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलची तीव्र कमतरता जाणवत आहे. डिझेल वेळेवर मिळत नसल्याने मशागतीच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तसेच डिझेलचे दर वधारल्याचे कारण पुढे करत ट्रॅक्टर चालकांनीही मशागतीचे दर वाढवले आहेत. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
शिरपूर तालुक्यातील खरिपाचे 'नियोजन' एका नजरेत (हेक्टरमध्ये)
तालुक्यात यंदा एकूण ८१,८०९ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापूस आणि मक्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
मुख्य पिके प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
कापूस ३५,६५० हेक्टर
मका ३०,१२५ हेक्टर
सोयाबीन ३,३४० हेक्टर
ज्वारी २,५५० हेक्टर
बाजरी २,२५० हेक्टर
भुईमूग १,०१० हेक्टर
तूर ९५० हेक्टर
उडीद ६९० हेक्टर
मूग / तीळ १०० हेक्टर / ६५ हेक्टर
विशेष नोंद: तालुक्यात कापूस आणि मका पिकाचे क्षेत्र जवळपास सारखेच असून, या दोन्ही प्रमुख पिकांची मिळून तब्बल ६५,७७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. तर इतर पिकांसाठी शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
कृषी विभागाचा इशारा: चढ्या दराने बियाणे विकल्यास थेट कारवाई!
"जर कोणताही दुकानदार किंवा व्यापारी कापसाचे बियाणे छापील किमतीपेक्षा जास्त भावाने विकत असेल, तर शेतकऱ्यांनी बिल किंवा पुराव्यासह थेट कृषी विभागाकडे तक्रार करावी. अशा तक्रारींवर तात्काळ संबधित दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल."
- कैलास गोपाळ (प्रभारी तालुका
कृषी अधिकारी, शिरपूर)

0 Comments