आरोपींना पाठीशी घालणारे डीवायएसपी राजकुमार केंद्रे यांच्यावर कारवाई करा; रिपब्लिकन सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

 आरोपींना पाठीशी घालणारे डीवायएसपी राजकुमार केंद्रे यांच्यावर कारवाई करा; रिपब्लिकन सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

हट्टा (विशेष प्रतिनिधी):

हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन येथील बौद्ध शेतकरी किर्तने यांच्यावर झालेल्या अन्यायप्रकरणी गुन्हा दाखल असूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. लाखो रुपयांच्या उसाचे नुकसान, जातिवाचक शिवीगाळ आणि अत्याचार होऊनही आरोपींना अटक होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आरोपींना जाणीवपूर्वक पाठीशी घालणारे पोलीस उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) राजकुमार केंद्रे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे नेते किरण घोंगडे यांनी केली आहे.

नेमके प्रकरण काय?

तपोवन येथील बौद्ध शेतकरी किर्तने यांच्या शेतातील लाखो रुपयांच्या उसाचे नुकसान करण्यात आले होते. तसेच त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही पोलीस प्रशासनाकडून आरोपींना अटक करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.

डीवायएसपी केंद्रे यांच्यावर गंभीर आरोप

किरण घोंगडे यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

"डीवायएसपी राजकुमार केंद्रे यांच्या कार्यक्षेत्रात अनेक ॲट्रॉसिटी प्रकरणांमध्ये आरोपींना जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे. दलित आणि बौद्ध समाजावर अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांना संरक्षण देणारे अधिकारी आम्हाला अजिबात मान्य नाहीत. केंद्रे यांच्या भूमिकेमुळे पीडितांना न्याय मिळण्यास उशीर होत आहे," असा गंभीर आरोप घोंगडे यांनी केला.

...अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार!

रिपब्लिकन सेनेने पोलीस प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. तपोवन प्रकरणातील मुख्य आरोपींना तात्काळ बेड्या ठोकण्यात याव्यात, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा किरण घोंगडे यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला संपूर्णपणे पोलीस प्रशासनच जबाबदार असेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले 



Post a Comment

0 Comments