धुळे : धुळेकरांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेले नूतन स्त्री व बाल रुग्णालय उद्घाटनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. युवा सेना मागणी



 धुळे : धुळेकरांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेले नूतन स्त्री व बाल रुग्णालय उद्घाटनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीला चक्क १० फुटांचे मोठे भगदाड पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे धुळ्याच्या विकासाला पुन्हा एकदा मोठा तडा गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच युवासेना सहसचिव ॲड. पंकज गोरे यांनी पदाधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

मागील पावसाळ्यात आयसीयू गळाल्याचा संदर्भ

पाहणी दरम्यान ॲड. पंकज गोरे यांनी रुग्णालय प्रशासनातील आणि बांधकाम विभागाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला. "मागील पावसाळ्यात याच रुग्णालयाचे आयसीयू (ICU) गळाल्याची घटना ताजी असताना, आता उद्घाटनापूर्वीच प्रवेशद्वाराची भिंत कोसळणे अत्यंत संतापजनक आहे," असे ते म्हणाले. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही इतक्या निकृष्ट दर्जाचे काम कसे झाले? असा सवाल करत त्यांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

स्पॉट पंचनामा आणि चौकशीची मागणी

रुग्णालय सुरू झाल्यानंतर अशी दुर्घटना घडल्यास रुग्णांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ही संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी युवासेनेतर्फे तात्काळ या संपूर्ण कामाचा स्पॉट पंचनामा करण्यात आला.

या प्रकरणी ॲड. गोरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी खालील मागण्या केल्या आहेत:

मुंबई आरोग्य आयुक्तालय स्तरावरून त्रिसदस्यीय समिती नेमून या संपूर्ण कामाची सखोल चौकशी व्हावी.

कामाचा निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) केले आहे. त्यामुळे एवढा मोठा निधी खर्च करूनही बांधकाम विभागाने ठेकेदारावर नेमके काय नियंत्रण ठेवले? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

या पाहणी दरम्यान युवासेनेचे सागर साळवे, सौरभ जवराळ यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या प्रकरणी आरोग्य प्रशासन आणि बांधकाम विभाग काय पावले उचलणार, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments