सातपुड्याच्या कुशीत भरदिवसा वनसंपदेची कत्तल; मेवासी वन विभागाचे अधिकारी ‘बघ्या’च्या भूमिकेत!
काठी (ता. अक्कलकुवा):
सातपुडा परिसरातील मोलगी, भगदरी, काठी, डाब आणि वडफळी वन विभागाच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वन अधिकाऱ्यांच्या कथित दुर्लक्षामुळे आणि मूक संमतीमुळे येथील मौल्यवान वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेवासी वन विभागांतर्गत येणाऱ्या मोलगी, भगदरी, काठी, डाब आणि वडफळी गावांच्या सीमेवरील 'बारी खाडी' या ठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणावर मौल्यवान सागवान आणि इतर प्रजातींची जिवंत झाडे होती. या वनसंपदेचे रक्षण करण्याची जबाबदारी शासनाने संबंधित बीट अंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रपाल, वनपाल आणि वनरक्षक यांच्यावर सोपवली आहे. मात्र, सध्या या भागात भरदिवसा बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर सागवानाची राजरोस तोड केली जात आहे. वन विभागाचे कर्मचारी या गंभीर प्रकाराकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष करून केवळ ‘बघ्या’ची भूमिका घेत असल्याचा थेट आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.
जंगलांना आगी लावण्याचे सत्र; दुर्मिळ जैवविविधता धोक्यात
वृक्षतोडीबरोबरच सातपुडा पर्वतातील जंगलांना जाणीवपूर्वक आगी लावण्याचे सत्रही सध्या सुरू आहे. आमली बारी गावाच्या समोरील डोंगरावरील जंगलाला आग लावून येथील दुर्मिळ जैवविविधता संपूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे. सातपुड्याच्या इतर दुर्गम भागातही अशाच प्रकारे जंगलांना आगी लावण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
या संदर्भात काठी (ता. अक्कलकुवा) येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सरवरसिंग पाडवी यांनी तळोदा येथील मेवासी वन विभागाच्या उपवन संरक्षकांना सोमवारी लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. बारी खाडी येथील जंगल नष्ट होण्यास कारणीभूत ठरलेल्या संबंधित वनक्षेत्रपाल, वनपाल व इतर कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी, त्याचा अहवाल तक्रारदारास मिळावा आणि दोषींवर तातडीने निलंबनाची किंवा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जितेंद्र पाडवी यांनी केली आहे.
अधिकारी काय म्हणतात?
"घडलेल्या घटनेची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून या संदर्भात वन गुन्हा नोंदवला आहे. पुढे जाऊन अशा घटना घडू नयेत, यासाठी रात्रीची गस्त देखील वाढवण्यात आली आहे."
– निखिल अखंडे (वनपरिक्षेत्र अधिकारी, काठी, ता. अक्कलकुवा)

0 Comments