घाटकोपरच्या भीमनगर येथील धम्मरत्न बुद्ध विहारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त तसेच बुद्धमूर्ती स्थापना सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्यदिव्य वातावरणात पार पडला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि जय भवानी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावून जनतेशी संवाद साधला.
यावेळी भीम अनुयायांचा उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि आंबेडकरी विचारांप्रती असलेली निष्ठा विशेषत्वाने दिसून आली. कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी आंबेडकरी चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी हेमंत रणपिसे यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. चळवळीतील त्यांचे समर्पण, संघर्षातील सातत्य आणि सामाजिक कार्यातील योगदान यांचा उल्लेख करत त्यांना खंबीर सहकारी म्हणून गौरविण्यात आले. “आंबेडकरी चळवळ ही केवळ भाषणांनी नव्हे, तर रणपिसे परिवारासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या त्यागावर उभी आहे,” अशी भावना व्यक्त करण्यात आली.
संयुक्त जयंती महोत्सव आणि बुद्धमूर्ती स्थापना सोहळ्यामुळे भीमनगर परिसरात सामाजिक, धार्मिक आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणादायी ऊर्जा निर्माण झाली.



0 Comments