Breaking News | साक्री तालुक्यात धक्कादायक दुहेरी हत्याकांड; अवघ्या काही तासांत मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात!



 Breaking News | साक्री तालुक्यात धक्कादायक दुहेरी हत्याकांड; अवघ्या काही तासांत मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात!

-

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अवघ्या काही तासांतच या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. रायपूर ते वर्धाने रस्त्यावर जयश्री काकुस्ते या महिलेचा दुचाकीजवळ संशयास्पद मृतदेह आढळला होता, तर तिच्यासोबत असलेल्या अक्षय सोनवणे या तरुणाचा मृतदेह उभरांडी शिवारातील गोशाळेमागे पुरलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी महिलेच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल सुरक्षित असल्याने हा प्रकार लुटीच्या उद्देशाने झाला नसल्याचे स्पष्ट झाले होते, ज्यामुळे या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती.


या गंभीर घटनेनंतर निजामपूर पोलीस ठाण्याचे सपोनि मयूर भामरे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवत संशयित योगेश खैरनार याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्याने जयश्री काकुस्ते यांचा गळा आवळून खून केल्याची आणि अक्षयचीही हत्या करून त्याचा मृतदेह वन जमिनीत लपवून ठेवल्याची धक्कादायक कबुली दिली. पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आता या दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

-

Post a Comment

0 Comments