नंदुरबारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा उत्साहात संपन्न
नंदुरबार, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडी, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जनसंवाद मेळावा मोठ्या उत्साहात व कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यास वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना सुजात आंबेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील रखडलेला विकास, घराणेशाही राजकारण, बेरोजगारी, आदिवासी व वंचित समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष यावर तीव्र टीका केली. त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधत, "नंदुरबार म्हणजे आमची जहागिरदारी असल्यासारखे या पक्षांनी जिल्ह्याची लूट केली आहे. जिल्ह्याचा खरा विकास करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला एकदा संधी द्या. आम्ही आदिवासी, वंचित आणि पीडित समाजाचा विकास कसा करायचा हे दाखवून देऊ," असे मत व्यक्त केले.
तसेच काही राजकीय पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत त्यांनी जनतेला सजग राहण्याचे आवाहन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या जनसंवाद मेळाव्यास जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध भागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.




0 Comments