खबरदार..! दुधात थेंबभरही भेसळ आढळली, तर खैर नाही! - आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कडक इशारा
मुंबई
राज्यातील दुधातील भेसळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. "राज्यात दुधातील भेसळीचे समूळ उच्चाटन झालेच पाहिजे. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर आणि ग्राहकांना दर्जेदार व शुद्ध दूध पुरवठा व्हायला हवा. दुधामध्ये भेसळीचा एकही थेंब सापडता कामा नये अथवा त्यामध्ये भेसळीचा कोणताही घटक आढळता कामा नये," असा कडक इशारा अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
मुंबई येथील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी दूध संस्थांना कायदेशीर बाबी तपासून आणि पूर्ण सावधानता बाळगून दूध संकलनास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. "असे न केल्यास भेसळखोरांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
९० दूध संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीला राज्यातील सहकारी व खाजगी क्षेत्रातील एकूण ९० दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत अन्न व भेसळ प्रतिबंधक कायदा आणि प्रत्यक्षात दूध संस्थांचे होणारे व्यवहार यामधील प्रत्यक्ष तफावतीबाबतचे सादरीकरण (Presentation) करण्यात आले. या सादरीकरणानंतर दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणीही मांडल्या. यावर बोलताना मुंढे यांनी स्पष्ट केले की, दुधातील भेसळ रोखण्यासाठी पुढील काळात सर्वांच्या सहकार्याची आणि ठोस कृतीची गरज आहे.
बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:
तालुका पातळीवर मार्गदर्शन: अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गरज असेल तिथे तालुकास्तरावर स्वतः जाऊन दूध संस्थांना कायदेशीर माहिती आणि मार्गदर्शन करतील.
प्रामाणिक संस्थांना पूर्ण सहकार्य: जे प्रामाणिकपणे आणि चांगले काम करत आहेत, त्यांना विभागाचे उत्तम सहकार्य मिळेल. कोणत्याही अधिकाऱ्याने जाणूनबुजून त्रास दिल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा.
भेसळखोरांवर थेट कारवाई: दुधात भेसळ आढळल्यास कायदेशीर कारवाई होणारच. संबंधित दोषींना माझ्याकडे येण्याची गरज नसून, त्यांना थेट कारवाईला सामोरे जावे लागेल.
भेसळीचा कलंक पुसणार: दुधातील भेसळीचा कलंक पुसून टाकण्यासाठी आम्ही सर्व दूध संस्थांबरोबर मिळून काम करू आणि महाराष्ट्रातून दुधातील भेसळीचे समूळ उच्चाटन करू.
शुद्ध पनीर मिळवून देणार: ग्राहकांना दुधापासून तयार केलेले अगदी शुद्ध पनीरच मिळायला हवे, यासाठी विशेष काम केले जाईल.
दूध संस्थांनी ठिकठिकाणी होणाऱ्या दूध संकलनाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी आणि पुढील काळात दुधातील भेसळ कशी रोखावी, याबाबत आयुक्त मुंढे यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर दूध संस्थांच्या प्रतिनिधींनीही सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

0 Comments