कोंढवा येथील ज्योती चौकात वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा निळा ध्वज स्थापित
पुणे : कोंढवा परिसरातील ज्योती चौक येथे बहुजन समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला निळा ध्वज काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी हटविल्याच्या घटनेनंतर परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर यांच्या वतीने आज ज्योती चौक येथे भव्य-दिव्य निळा ध्वज पुन्हा उभारण्यात आला.
निळा ध्वज हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, संविधानिक मूल्यांचा तसेच बहुजन समाजाच्या स्वाभिमानाचा प्रतीक असल्याने तो हटविण्याच्या प्रकाराचा वंचित बहुजन आघाडीसह विविध सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध केला होता. या घटनेविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी, बहुजन बांधव, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक ज्योती चौक येथे एकत्र आले.
यावेळी उपस्थितांच्या घोषणाबाजी व उत्साही वातावरणात निळा ध्वज पुन्हा दिमाखात फडकविण्यात आला. त्यानंतर ध्वज उतरविण्याच्या प्रकारात सहभागी असलेल्या समाजकंटकांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने कोंढवा पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार अर्ज दाखल केला. संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, निळा ध्वज हा केवळ एक झेंडा नसून बहुजन समाजाच्या संघर्षाचा, स्वाभिमानाचा आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीचा वारसा आहे. अशा प्रकारच्या घटना समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या असून त्यांचा निषेध करण्यात आला. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलन व ध्वजारोहण कार्यक्रमात रफिक शेख, सतीश साबळे, परमेश्वर सनादे, स्वप्नील वाघमारे, नवनीत अहिरे, दीपक गायकवाड, शुभांगी काकडे, बेबीताई चांदणे, शरीफ शेख, अजय साळवे, अक्षय कांबळे, पप्पू खरात, बाळू शिरसाट, महादेव गायकवाड, प्रमोद कदम, राजू बोकेफोडे, दिलीप क्षेत्रे, विशाल वंजारी, सोमनाथ लोंढे, अभिजीत बनसोडे, ओंकार कांबळे, सविताताई चाबुकस्वार, प्रदीप पाडळे, जॉर्ज मदनकर, केशव लोंढे, दिलीप कांबळे, राम आखाडे, नानासाहेब भारुड, बसवंत सोनकांबळे, योगेश कदम, उदय वाघमारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, वंचित महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन व इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संविधानिक मार्गाने बहुजन समाजाच्या अस्मितेचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला.


0 Comments