२०० कोटींच्या प्रॉपर्टीची हेराफेरी'; भूमाफिया जमील अहमदवर कारवाईची मागणी

२०० कोटींच्या प्रॉपर्टीची हेराफेरी'; भूमाफिया जमील अहमदवर कारवाईची मागणी


धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील सुमारे २०० कोटी रुपयांच्या मालमत्तेची कथित हेराफेरी व शासनाची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत भूमाफिया जमील अहमद अब्दुल हमीद मुघल याच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रफीक शाह गुलाब शाह यांनी पत्रकार परिषदेत केली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत रफीक शाह यांनी सांगितले की, शासनाची फसवणूक करून महसूल बुडवत सुमारे १६ एकर जागेवर बेकायदेशीररीत्या नाव नोंदविण्यात आले. संबंधित जागेवर प्लॉट पाडून खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात आले असून, काही जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या माध्यमातून दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणाची माहिती अनेक वेळा महसूल प्रशासन, मनपा आयुक्त तसेच पोलिसांना देऊनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप रफीक शाह यांनी केला. उलट तक्रारदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून भूमाफिया जमील अहमद याच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. न्याय न मिळाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

Post a Comment

0 Comments