तुकाराम मुंडे यांची बदली नको, बौद्धभूमीचे पुनर्वसन हवे; संविधान संरक्षण समितीचे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन.
प्रतिनिधी धुळे
संविधान संरक्षण समिती, जिल्हा धुळे यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना दि.१६ जुन २०२६ रोजी धुळे जिल्हा प्रशासनामार्फत निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्यात आले. निवेदनात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध भेसळ, गुटखा व अवैध व्यवसायांविरोधात केलेल्या धडक कारवाईचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यक्षम व प्रामाणिक कामगिरीमुळे जनतेच्या आरोग्याचे संरक्षण होत असून शासनाची प्रतिमा अधिक मजबूत होत असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे त्यांची बदली इतरत्र करू नये तसेच राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी त्यांना महत्त्वाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच भेसळखोर व गुटखा माफियांविरोधातील कठोर कारवाईमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. याचबरोबर कल्याण येथील बौद्धभूमीच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा व बौद्ध बांधवांच्या भावना दुखावणाऱ्या घटनांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी समितीने शासनाकडे केली आहे. यावेळी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, ज्येष्ठ पत्रकार गो.पी. लांडगे, कॉम्रेड एल. आर. राव, दीपक जाधव, जी. डी. जाधव, बी. टी. अहिरे, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, हर्षबोध मोरे, काशिनाथ शिंदे, छोटू मोरे, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, विजय वाघ, कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड वसंत पाटील, दीपक सोनवणे यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments