नंदुरबारात १३ जून रोजी वंचित बहुजन आघाडीचा भव्य जनसंवाद मेळावा नंदुरबार, प्रतिनिधी


 नंदुरबारात १३ जून रोजी वंचित बहुजन आघाडीचा भव्य जनसंवाद मेळावा

नंदुरबार, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १३ जून २०२६ रोजी नंदुरबार येथे भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व आदिवासी समाजाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणार असून पक्षाची आगामी भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे.

नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरात सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज तथा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रथमच नंदुरबार जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मेळाव्यात शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या, वाढती महागाई, डिझेल-पेट्रोल व गॅस दरवाढ, शेतकऱ्यांच्या अडचणी, आदिवासी समाजाचे हक्क, स्थानिक विकासाची कामे तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच सामाजिक न्याय, संविधान संरक्षण आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका मांडली जाणार आहे.

जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जोरदार तयारी सुरू असून जिल्हाभरातून नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Post a Comment

0 Comments