लम्पीविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम; पहिल्या टप्प्यात ३७.५२ लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप सुरू
: राज्यातील जनावरांना लम्पी स्कीन डिसीज (LSD) या आजारापासून संरक्षण देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३७ लाख ५२ हजार गोटपॉक्स लसमात्रांचे जिल्हानिहाय नियोजनबद्ध वाटप सुरू करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येणार असून, जिल्हानिहाय मागणी व जोखमीच्या क्षेत्रांचा विचार करून लसमात्रांचे वितरण केले जात आहे.
लम्पी हा गुरांमध्ये आढळणारा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार असून, त्याचा दुग्ध व्यवसाय व पशुपालकांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्यात येत आहे. गोटपॉक्स लस लम्पीविरुद्ध प्रभावी ठरत असल्याने राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना जनावरांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे, तसेच लम्पीसदृश लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

0 Comments