Jalgaon Accident : साखरपुड्याला जाताना कारची एसटीला धडक, सहा जणांनी जागीच प्राण गमावले, गाडीत अडकलेल्या मुलाला गावकऱ्यांनी वाचवलं
Amalner Dhule Highway Car ST Bus Accident : अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस आणि दुचाकी आपल्या मार्गावरुन प्रवास करत असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नियंत्रण गमावून त्यांना समोरुन जोरदार धडक दिली.
: जळगाव जिल्ह्यात अमळनेर-धुळे महामार्गावर मंगळवारी सकाळी तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. कार, एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या गुजरात राज्यातील व्यारा येथील कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याची माहिती आहे
कारची बस-बाईकला धडक
मंगरूळ गावाजवळ सकाळी साधारण सात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस आणि दुचाकी आपल्या मार्गावरुन प्रवास करत असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नियंत्रण गमावले आणि समोरून जोरदार धडक दिली.धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील पाच प्रवाशांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे.
अपघातात कारमध्ये अडकलेल्या एका लहान मुलाला मंगरूळ ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बसमधील एका प्रवाशालाही दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

0 Comments