Sachin Ahir : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड; महाविकास आघाडीकडून अर्ज मागे
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार सचिन अहिर यांची एकमताने निवड झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. सचिन अहिर यांच्या निवडीची घोषणा होताच सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.
विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सचिन अहिर, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विधान परिषदेतील संख्याबळ पाहता महायुतीचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, सभागृहाची परंपरा आणि सलोखा राखण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांना त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. Politics
तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीला मान देत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात भूमिका मांडली. सभागृहाची इच्छा जर सर्वानुमते निवडीची असेल, तर आम्ही त्याचा आदर करतो, असे म्हणत अनिल परब यांनी अभ्यंकर यांचा उमेदवारी प्रस्ताव मागे घेत असल्याची घोषणा केली. विरोधकांच्या या भूमिकेनंतर सचिन अहिर यांची उपसभापतीपदी आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली.
दरम्यान, या बिनविरोध निवडीमुळे विधान परिषदेतील राजकीय सलोख्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.तसेच सभागृहाची परंपरा राखत ही निवड एकमताने केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे आभार मानले, तसेच नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांचे अभिनंदन केले.

0 Comments