मालेगावच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची नवी दारे; ग्रंथालय व अभ्यासिकेच्या कामांचे भूमिपूजन

 मालेगावच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची नवी दारे; ग्रंथालय व अभ्यासिकेच्या कामांचे भूमिपूजन



मालेगाव : शहराचा शैक्षणिक व बौद्धिक विकास अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात येत आहेत. स्थानिक विकास निधीतून उभारण्यात येणाऱ्या ग्रंथालय व अभ्यासिका तसेच अभ्यासिकेच्या कामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले.

या दोन्ही विकासकामांचे भूमिपूजन काँग्रेस खासदार शोभाताई बच्छाव मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरेन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कॅम्प परिसरातील सर्व्हे क्र. १०४२/अ येथे ग्रंथालय व अभ्यासिका, तर इस्लामपुरा वॉर्डातील सर्व्हे क्र. ७६ येथे अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. या सुविधांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक तसेच अभ्यासासाठी शांत व योग्य जागेच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थ्यांना शांत वातावरणात अभ्यास करता यावा, ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत आणि त्यांच्या शैक्षणिक व स्पर्धात्मक परीक्षांच्या स्वप्नांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

भूमिपूजन कार्यक्रमास काँग्रेस खासदार शोभाताई बच्छाव ,ज्येष्ठ नेते हाजी युसुफ नॅशनल, धुळे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजी सबीर खान, हाजी अकलाख, शरद खैरनार, इमरान इंजिनिअर, मयूर वांद्रे, कैलास पाटील, जैनुद्दीन पठाण, यशवंत खैरनार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या ग्रंथालय व अभ्यासिका मालेगावच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या ठरणार आहेत.

Post a Comment

0 Comments