धुळे जिल्ह्यात उद्योग गुंतवणुकीला चालना देण्यासाठी गुंतवणूकदार परिषद
धुळे : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने धुळे जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद उत्साहात पार पडली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आयोजित या परिषदेत जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधी व सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या परिषदेला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार मंजुळा गावित, खासदार शोभा बच्छाव यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी, उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यातील विविध एमआयडीसी परिसरांमध्ये उद्योगांसाठी उपलब्ध सुविधा, पायाभूत सुविधा, गुंतवणुकीच्या संधी तसेच नवीन उद्योग उभारण्यासाठी आवश्यक बाबींवर परिषदेत चर्चा झाली. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे, विद्यमान उद्योगांचा विस्तार करणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.
कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग, लॉजिस्टिक पार्क, वेअरहाऊसिंग तसेच नवउद्योजकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही विविध मुद्दे मांडण्यात आले.
धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्यासाठी प्रशासन आणि उद्योजक यांच्यात समन्वय वाढविण्याची गरज असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


0 Comments