धुळे तालुक्यात दुष्काळाची भीषण छाया!१४७ गावांचा खरीप संकटात; विहिरी तळाला, उभी पिके करपली!पाऊस गायब, जलस्रोत आटले; खरीप हाती येण्याआधीच शेतकरी कर्जाच्या खाईत




धुळे / प्रतिनिधी - धुळे तालुक्यातील १४७ गावांवर कोरड्या दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले असून, यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून निसटण्याची भीती निर्माण झाली आहे. जूनपासून सुरू झालेला खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाही पावसाने सातत्याने पाठ फिरवल्याने अनेक भागांतील उभी पिके करपून गेली आहेत. शेतात हिरवाईऐवजी पिकांची वाळलेली कणसे आणि जमिनीवर पडलेल्या भेगा दिसत असून, कष्ट, पैसा आणि आशा या तिन्हींचे मोठे नुकसान झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. पेरणीसाठी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी आणि फवारणी यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उसने पैसे, कर्ज आणि उधारीचा आधार घेतला. पिके उभी राहिल्यानंतर आता चांगला पाऊस होईल आणि उत्पादन हातात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पिकांच्या वाढीच्या निर्णायक टप्प्यावरच पावसाने दडी मारल्याने ही आशा मावळू लागली.

ऑगस्टच्या सुरुवातीला काही भागात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाने खंड दिल्याने कोरडवाहू शेतीतील पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. काही भागात पिके अक्षरशः करपल्याचे चित्र आहे.

विहिरी-बोअरवेलची पाणीपातळी तळाला

केवळ कोरडवाहू शेतकरीच नव्हे, तर बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही यंदाच्या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. पावसाअभावी विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांची पाणीपातळी झपाट्याने खाली गेली आहे. उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी वापर करताना पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

फळबागांसमोरही जगण्याचा प्रश्न

तालुक्यातील लिंबू, डाळिंब, पेरू, चिकू यांसारख्या फळबागांनाही पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. फळबाग उभी करण्यासाठी अनेक वर्षे खर्च करून जोपासलेल्या बागांना पाणी मिळाले नाही, तर झाडांचे नुकसान होण्याबरोबरच शेतकऱ्यांची दीर्घकालीन गुंतवणूक धोक्यात येऊ शकते.

“बाग वाचवायची कशी आणि पाणी आणायचे कुठून?” हा प्रश्न आता बागायतदारांसमोर उभा राहिला आहे.

पिके गेली; कर्ज मात्र कायम!

खरीप हंगामासाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते पूर्णपणे कोलमडली आहेत. बियाणे, खत, औषधे, डिझेल, मजुरी आणि मशागतीचा खर्च आधीच झालेला असताना उत्पादन हातात येण्याची शक्यता कमी झाली आहे.

त्यामुळे “शेतात उत्पादन नाही, मात्र डोक्यावर कर्जाचा डोंगर” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतमाल विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर्जफेड, घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि पुढील हंगामाची तयारी अवलंबून असते. मात्र खरीपच संकटात आल्याने पुढील आर्थिक चक्रही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

शेतमजुरांवरही संकटाची कुऱ्हाड

शेतीची कामे कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतमजुरांवर होणार आहे. पेरणी, खुरपणी, फवारणी, कापणी आणि इतर शेतीकामांमधून मिळणाऱ्या रोजगारावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. उत्पादन घटल्यास शेतीवरील रोजगाराच्या संधीही कमी होण्याची शक्यता आहे.

गुरांसाठी चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

पावसाने आणखी दडी मारल्यास केवळ मानवी पाणीटंचाईच नव्हे, तर पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ शकते. धरणे, तलाव, बंधारे आणि स्थानिक जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा न झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

दसरा जवळ; मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात चिंता

दसऱ्याला आता साधारण एक महिना शिल्लक असताना उर्वरित काळात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती, पिण्याचे पाणी, पशुधन आणि रोजगार या चारही आघाड्यांवर संकट गडद होऊ शकते.

शेतकऱ्यांच्या मते, केवळ पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा प्रशासनाने परिस्थितीचे तातडीने वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणे आवश्यक आहे. पिकांची स्थिती, जलस्रोतांची पाणीपातळी, चारा उपलब्धता आणि पिण्याच्या पाण्याची स्थिती यांचा स्वतंत्र आढावा घेण्याची मागणी होत आहे.

कापडणेपासून लामकानीपर्यंत मदतीची हाक

कापडणे, देवभाने, धनूर, लोणकुटे, तामसवाडी, न्याहळोद, कौठळ, लामकानी यांसह विविध गावांतील शेतकऱ्यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाईसाठी आवश्यक कार्यवाही, पाणीटंचाई निवारण, जनावरांसाठी चारा-पाणी, तसेच पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या उपलब्ध मदत योजनांचा लाभ मिळवून देण्याची मागणी पुढे येत आहे.

प्रशासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

एकीकडे शेतातील पिके वाळत आहेत, दुसरीकडे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने घटत आहे आणि तिसरीकडे शेतीवर केलेला खर्च डोक्यावर कर्जाचे ओझे वाढवत आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा केवळ पावसाचा प्रश्न राहिलेला नसून उत्पन्न, कर्जफेड, पशुधन, पाणी आणि पुढील हंगामाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे.

आता शासन आणि प्रशासन या परिस्थितीकडे किती गांभीर्याने पाहते आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणत्या तातडीच्या उपाययोजना करते, याकडे धुळे तालुक्यातील १४७ गावांतील शेतकरी डोळे लावून बसले आहेत.

Post a Comment

0 Comments