मी तिला काही सल्ला देण्याची गरज नाही’; नीला विखे पाटील स्वीडिश संसदेत खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटलांचा आनंद

 मी तिला काही सल्ला देण्याची गरज नाही’; नीला विखे पाटील स्वीडिश संसदेत खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटलांचा आनंद


अहिल्यानगरशी नाते असलेल्या नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या रिक्सडाग संसदेत खासदार म्हणून निवडून येत नवा राजकीय टप्पा गाठला आहे. स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आहे.

नीला विखे पाटील या ग्रीन पार्टीच्या सक्रिय सदस्या असून त्यांनी स्टॉकहोम नगर परिषदेतही काम केलं आहे. याशिवाय स्वीडिश पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

नीला या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत. त्यांच्या यशाबद्दल बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी आनंद व्यक्त केला आणि नीला लहानपणापासूनच सक्रिय असल्याचं सांगितलं.

अशोक विखे पाटील यांनी मेहनतीने मुलांचे शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना सुजाण नागरिक होण्याची शिकवण दिली. त्याचाच परिणाम म्हणून आज नीला स्वीडनच्या संसदेत पोहोचल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

‘मी तिला काही सल्ला देण्याची गरजच नाही. आपल्याकडची आणि तिकडची कार्यपद्धत वेगळी आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतातील आणि स्वीडनमधील सामाजिक-राजकीय वातावरणात फरक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

नीला विखे पाटील या माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आणि डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. बालकल्याण आणि पर्यावरणाच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा त्यांचा मानस असल्याचं सांगितलं जात आहे.

नीला यांच्या स्वीडिश संसदेत निवडीमुळे महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबाचीही चर्चा होत आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments