अतिक्रमण निर्मूलन मोहिमेविरोधात स्टेशन रोडवरील रहिवासी संतप्त! जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा; ठिय्या आंदोलनही जारी
धुळे (प्रतिनिधी): महानगरपालिकेकडून शहरात राबवल्या जाणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेविरोधात स्टेशन रोड परिसरातील रहिवासी प्रचंड संतप्त झाले आहेत. प्रशासनाने रहिवाशांना कोणत्याही पर्यायी व्यवस्थेशिवाय घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्यामुळे, आज संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक 'विराट मोर्चा' काढला. न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे.
ऐतिहासिक पुराव्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
आंदोलकांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, या वस्तीतील रहिवाशांकडे १९६० पासूनचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. यामध्ये जुने जन्म-मृत्यू दाखले, शाळा सोडल्याचे दाखले आणि १९६० पासूनच्या मतदार याद्या व घरपट्टीच्या पावट्यांचा समावेश आहे. ज्या पुराव्यांच्या आधारे नागरिक मतदान करतात आणि मनपा घरपट्टी गोळा करते, त्याच वस्तीला आज प्रशासन अचानक 'अतिक्रमण' ठरवून गरिबांचे संसार उद्ध्वस्त करत असल्याचा तीव्र आरोप रहिवाशांनी केला आहे.
२०१७ च्या लेखी कराराचा विश्वासघात
या आंदोलनाचा मुख्य रोख मनपाच्या कार्यपद्धतीवर आहे. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता दादागिरीने घरे तोडली होती. त्यानंतर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर १ नोव्हेंबर २०१७ रोजी तत्कालीन आयुक्त आणि महापौरांनी लेखी करार केला होता. या करारानुसार, रहिवाशांचे मनपा शाळा क्र. २९ च्या जागेवर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ७ वर्षे उलटूनही या कराराची अंमलबजावणी न करता उलट पुन्हा एकदा रहिवाशांना बेघर करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
१३० कुटुंबे वाऱ्यावर!
सन २०१७ मध्ये मनपाकडे यशवंत नगर येथे म्हाडाची ६५ घरकुले होती, त्यामुळे १३० पेक्षा अधिक कुटुंबांना वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यामुळे विवश होऊन या कुटुंबांनी पुन्हा रस्त्याशेजारील चिंचोळ्या पट्टीत आसरा घेतला. जर मनपाने तेव्हाच सर्व २२० कुटुंबांचे पुनर्वसन केले असते तर आज ही वेळ आली नसती, हा महत्त्वाचा मुद्दा आंदोलकांनी लक्षात आणून दिला आहे.
पुनर्वसन जागी संदर्भात कोणताही अधिकृत विकास आराखडा मनपाकडे नसल्याची माहिती अधिकारात समोर आली आहे.
राजकीय दबाव आणि धनदांडग्यांचे हितसंबंध
रेल्वे स्टेशन रोडची ही जागा अत्यंत मोक्याची आणि मध्यवर्ती आहे. या वस्तीच्या समोर असलेल्या उच्चभ्रू समाजाचे प्लॉट्स आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेल्सचे बाजारभाव वाढवण्यासाठी प्रशासन राजकीय दबावापोटी ही दलित वस्ती मुद्दाम हुसकावून लावण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा खळबळजनक आरोप रहिवाशांनी केला आहे.
मुख्य मागण्या आणि ठिय्या
आंदोलकांनी मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवडमधील यशस्वी पुनर्वसनाचे उदाहरण देत, धुळ्यातही 'आहे त्याच ठिकाणी' किंवा शहराच्या मुख्य प्रवाहात सामूहिक पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करून २०१७ च्या कराराची अंमलबजावणी करण्याचे आदेश देत नाहीत, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हलणार नाही, असा पवित्र आंदोलकांनी घेतला आहे.
आंदोलकाचा आकस्मिक मृत्यू; वस्तीत शोक व संताप
आंदोलन सुरू असतानाच एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. स्टेशन रोडवरील रहिवासी शिवा सोनवणे (वय ५०) या आंदोलकाचा आकस्मिक मृत्यू झाला. आंदोलनस्थळी अस्वस्थ वाटू लागल्याने सोनवणे हे घरी गेले होते, मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घर जाण्याच्या भीतीने शिवा सोनवणे हे काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होते. या तणावामुळेच त्यांचा मृत्यू झाला असून, सोनवणे हे 'प्रशासकीय व्यवस्थेचे बळी' ठरल्याचा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे.
आंदोलनाला मिळतोय मोठा पाठिंबा
आजच्या आंदोलनात स्थानिक आकाश बागुल, विनोद केदार, गौरव जावरे, सागर बागुल, अंकुश सोनवणे, गंगुबाई साळवे, राजमल मोरे, छाया मोरे, चंद्रभागा मोरे, सुनिता मोरे, नामदेव मोरे, भीमराव निकम, वाल्मिक निकम, पूनम निकम, सिद्धार्थ साळवे, अनिता साळवे, लक्ष्मीबाई बागुल, इंदुबाई झालटे, यशवंत जिरे, निलेश अहिरे, भूमिका भामरे, मनिषा जगदेव, रंजना जाधव, दीपक साळवे, रोहन जाधव, भास्कर जाधव, मधू जाधव, सुहानी जाधव, महेश अमृतसागर, संजय सोनवणे, प्रियंका सोनवणे, संदेश सोनवणे, रेखा सोनवणे, मनोज केदार, प्रवीण पगारे, महेश अमृतसागर, पल्लवी अमृतसागर आदी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, या आंदोलनाला बऱ्याच दलित संघटनांसह इतर सामाजिक संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. या मोर्च्यात शमिभा पाटील, रविकांत वाघ, शशिकांत वाघ,शंकर खरात, राज चव्हाण ,बापू बागुल, बापू बाविस्कर, संजय अहिरे, आनंद लोढे, पार्वती जोगी, राज चव्हाण, अॅड. संतोष जाधव, ॲड विशाल साळवे,अनिल दामोदर, मनिषा खैरनार, सिध्दार्थ जगदेव, सागर मोहिते, संजय चव्हाण, चंद्रमणी वाघ , गौतम पगारे, सागर धिवरे , गणेश जगदेव बॉबी नागमल सहभागी झाले होते



0 Comments