साक्री तालुक्यात दुहेरी हत्याकांडाविरोधात जनआक्रोश; भोंदू बाबाला फाशी देण्याच्या मागणीसाठी काढला मूक मोर्चा
धुळे / साक्री: तालुक्यातील वर्धाणे व उभरांडी शिवारात १६ मे रोजी झालेल्या अक्षय सोनवणे व जयश्री काकुस्ते यांच्या अत्यंत क्रूर आणि अमानुष दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ काल भाडणे ते साक्री दरम्यान ग्रामस्थांचा आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा विराट मूक मोर्चा काढण्यात आला. या नराधम कृत्याविरोधात संपूर्ण साक्री तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त होत असून, मुख्य आरोपी योगेश खैरनार उर्फ भोंदू बाबा याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.
पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी हजारो नागरिक या मूक मोर्चामध्ये रस्त्यावर उतरले होते. मोर्चाच्या समाप्तीनंतर एका शिष्टमंडळाने थेट प्रशासनाची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन
मोर्च्याच्या समाप्तीनंतर शिष्टमंडळाने साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या तीव्र भावना आणि मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.
प्रशासनाकडून कडक कारवाईचे आश्वासन: निवेदन स्वीकारताना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे आणि तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले की, "या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेमार्फत अत्यंत गांभीर्याने आणि कायद्याच्या चौकटीत राहून कडक रीतीने केला जाईल. या गुन्ह्यातील कोणताही दोषी सुटणार नाही, याची पूर्ण खबरदारी प्रशासन घेईल."
खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी
या संदर्भात प्रतिक्रिया देताना अजय सोनवणे यांनी सांगितले की, "या नराधमाला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नका. भोंदू योगेश खैरनार याच्या पाठीशी उभे राहणाऱ्या किंवा या गुन्ह्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामील असलेल्या सर्व दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल."
या गंभीर घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून, पोलिसांच्या पुढील तपासाकडे आणि कायदेशीर कारवाईकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

0 Comments