देशशिरवाडे गावात बिबट्याचा थरार! रात्री शतपावलीस गेलेल्या वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला; ग्रामस्थांच्या धाडसामुळे वाचले प्राण
पिंपळनेर (प्रतिनिधी): साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गावात रात्रीच्या सुमारास शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रचंड धाडसामुळे या शेतकऱ्याचे प्राण थोडक्यात वाचले असून, या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
जेवणानंतर शतपावली करताना अचानक हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, देशशिरवाडे येथील शेतकरी जिभाऊ वाघ (वय ६०) हे नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण करून देशशिरवाडे ते ताहराबाद रस्त्यावर शतपावली (फेरफटका) मारण्यासाठी गेले होते. रात्री ९:३० वाजेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. बिबट्या अंगावर येताच जिभाऊ वाघ यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला.
ग्रामस्थांचे धाडस; बिबट्याचा यशस्वी प्रतिकार
जिभाऊ वाघ यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जवळच शेतात असणारे प्रकाश महाजन, मधुकर सोनवणे, धनंजय वंजी आणि सुचित चित्ते यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या ग्रामस्थांनी हातात काठ्या आणि दगड घेऊन बिबट्यावर हल्ला केला व त्याचा जोरदार प्रतिकार केला. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून बिबट्याने तेथून पळ काढला आणि जवळच असलेल्या झाडीत पसार झाला. ग्रामस्थांच्या या समयसुचकतेमुळे आणि धाडसामुळे जिभाऊ वाघ यांचे प्राण वाचले.
शासकीय रुग्णालयातील अनागोंदी: लस आणि औषधांचा तुटवडा
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी, गावातील प्रकाश सोनवणे, प्रमोद सोनवणे आणि सोनू पवार यांनी जखमी जिभाऊ वाघ यांना डॉ. प्रशांत गवळी यांच्या मदतीने तात्काळ पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, एवढी गंभीर घटना घडूनही सरकारी रुग्णालयातील अनागोंदी कारभार समोर आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर आवश्यक असलेली 'अँटी रेबीज' लस आणि इतर तातडीची औषधे सरकारी रुग्णालयात उपलब्ध नव्हती. त्यामुळे गंभीर जखमी असलेल्या वृद्ध शेतकऱ्याला उपचारासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली, ज्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
परिसरात पिंजरा लावण्याची मागणी
या हिंस्त्र हल्ल्यामुळे देशशिरवाडे आणि परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात तात्काळ पिंजरा लावावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

0 Comments