धुळे ब्रेकिंग न्यूज७०० कोटींच्या भूमिगत गटर योजनेमुळे वाहतूक विस्कळीत; नागरिक त्रस्त

ब्रेकिंग न्यूज धुळे
 ७०० कोटींच्या भूमिगत गटर योजनेमुळे वाहतूक विस्कळीत; नागरिक त्रस्त

धुळे शहरातील ७०० कोटी रुपयांच्या भूमिगत गटर योजनेचे काम सध्या विविध भागांत संथ गतीने सुरू आहे, तरी नियोजनाअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव चौफुली ते दसरा मैदान चौक या मुख्य मार्गावर सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतूक कोंडी वाढली असून वाहनधारक हैराण झाले आहेत.

रस्त्याच्या मध्यभागी पाइपलाइन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर अनेक ठिकाणी केवळ माती टाकून रस्ता बुजविण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत असून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. श्वसनाच्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे.

एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद असल्याने वाहतुकीचा संपूर्ण भार दुसऱ्या बाजूवर पडत आहे. परिणामी सतत वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स व इशारा फलक नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण होत आहे. यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनाही वाढल्याचे नागरिक सांगत आहेत.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गुरुद्वारा मार्गावर भूमिगत गटाराचे काम सुरू असून, हे काम शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. संबंधित ठिकाणी डांबरीकरणाचे काम मंजूर असून पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी अंदाजे अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सध्या मुंबई-आग्रा रोडसह मोहाडी, अंबिकानगर, चाळीसगाव रोड, मारुती नगर, कैलासनगर, पंचवटी व वरखेडी रोड परिसरातही भूमिगत गटर योजनेची कामे सुरू आहेत. नागरिकांनी विकासकामांना विरोध नसला तरी योग्य नियोजन, सुरक्षितता आणि तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments