सुशी नालाकाठावरील अतिक्रमण हटवल्यानंतर बाधितांच्या पुनर्वसनासाठी मनपा सरसावली; ११३ नागरिकांचे घरकुलासाठी अर्ज!
धुळे: देवपूर भागातील सुशी नाला काठावर करण्यात आलेले अतिक्रमण महापालिका प्रशासनाने हटवल्यानंतर आता बाधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मनपाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ११३ नागरिकांनी घरकुलासाठी आपले अर्ज आणि कागदपत्रे जमा केली आहेत.
२५० अतिक्रमणांवर झाली होती संयुक्त कारवाई
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून धुळे महानगरपालिका, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे सुशी नाल्याच्या दोन्ही बाजूंना असलेली सुमारे २५० अतिक्रमणे हटवली होती. या कारवाईमुळे बेघर झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत ६ मे रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत बाधित नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कागदपत्रांची पडताळणी सुरू
त्याच निर्णयानुसार शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९० आणि दुपारच्या सत्रात २३ अशा एकूण ११३ नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजना आणि शबरी आवास योजनेअंतर्गत घरकूल मिळण्यासाठी आपली कागदपत्रे प्रशासनाकडे जमा केली. नागरिकांनी जमा केलेल्या या सर्व कागदपत्रांची सध्या महापालिकेकडून कसून पडताळणी केली जात आहे.
"नागरिकांकडून जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी मनपाकडून केली जाईल. जे नागरिक नियमानुसार पात्र ठरतील, त्यांचाच प्रस्ताव मंजुरीसाठी पुढे पाठवला जाईल आणि त्यांनाच प्रधानमंत्री किंवा शबरी आवास योजनेचा लाभ दिला जाईल."
— कमलेश सोनवणे, महानगरपालिका अधिकारी
या पुनर्वसन मोहिमेमुळे सुशी नाला परिसरातील बेघर झालेल्या पात्र कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, महापालिकेच्या या गतिमान भूमिकेमुळे बाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे

0 Comments