सातारा जिल्ह्यात ३ लाख कुणबी नोंदी, पण प्रमाणपत्रे फक्त १५ हजार; मराठा प्रतिनिधींची मनोज जरांगे-पाटलांशी चर्चा
सातारा / अंतरवाली सराटी:
सातारा जिल्ह्यात साधारण २.५ ते ३ लाख कुणबी नोंदी सापडल्या असूनही, प्रशासकीय उदासीनतेमुळे आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १५ हजार कुणबी जात प्रमाणपत्रे वाटण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची अंतरवाली सराटी येथे सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत जिल्ह्यातील मराठा समाजाचे सामाजिक प्रश्न, कुणबी प्रमाणपत्रांमधील अडचणी आणि आगामी ३० मे रोजी होणाऱ्या आंदोलनावर जवळपास एक तास सविस्तर चर्चा करण्यात आली.
सातारा गॅझेटिअर आणि कुणबी नोंदींचा मुद्दा ऐरणीवर
बैठकीदरम्यान सातारा जिल्ह्यातील प्रतिनिधींनी 'सातारा गॅझेटिअर'चा हवाला दिला. राज्यात ५७ लाख कुणबी नोंदी असलेल्या कुटुंबातील नागरिक गेली ५९ वर्षे हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहिले आहेत, याकडेही यावेळी जरांगे-पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले. जात पडताळणी समिती मराठा समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा थेट आरोपही प्रतिनिधींनी या बैठकीत केला.
टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
"शासनाने पुराव्यांच्या सत्यतेवर आधारित एकसमान कार्यपद्धत विहीत केल्यास नागरिकांना सुलभतेने कुणबी प्रमाणपत्रे मिळतील," असे मत प्रतिनिधींनी मांडले. तसेच, तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयातील जे अधिकारी हेतुपुरस्सर कुणबी प्रमाणपत्र देण्यास विलंब करत आहेत अथवा टाळाटाळ करत आहेत, त्यांच्यावर तातडीने बदलीची किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला साताऱ्यातील प्रमुख मराठा बांधव व प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:
राजेंद्र निकम
माऊली सावंत
विवेक कुराडे-पाटील
सोहम शिर्के
विक्रम शितोळे
किरण भोसले
डॉ. विकास देशमुख
अरुण काकडे
अमोल घाडगे यांच्यासह अनेक मराठा बांधवांचा समावेश होता. आगामी ३० मे च्या आंदोलनाच्या रणनीतीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

0 Comments