धुळे: ४४ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई


 

धुळे: ४४ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

धुळे:

चंदीगड येथून महाराष्ट्रात तस्करी करून आणलेला सुमारे ४४ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा विदेशी मद्यसाठा शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून होणारी ही मोठी तस्करी उधळून लावत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?

​शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना एका वाहनातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरून मध्य प्रदेशातील सेंधवाकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या संशयित कंटेनरला (क्र. RJ 32 GB 4036) हाडाखेड चेकपोस्टवर अडवण्यात आले.

तपास आणि जप्ती

​पोलिसांनी कंटेनर चालकाची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता, त्यात 'ऑल सीजन्स', 'अंकल टॉम' आणि 'रॉयल चॅलेंज' या कंपन्यांच्या विदेशी दारूचे खोके आढळले. या बाटल्यांवर 'ओन्ली फॉर सेल इन चंदीगड' असे नमूद होते, ज्यावरून हा साठा महाराष्ट्रात कर बुडवून विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट झाले.

कारवाई आणि अटक

​या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक सतीशकुमार पुडाराम जाट (रा. चंदना, जि. कैथल, हरियाणा) याला ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार विजय ढिवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात 'भारतीय न्याय संहिता २०२३' आणि 'महाराष्ट्र दारूबंदी कायद्या'च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत. ही कारवाई निरीक्षक जयपाल हिरे आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Post a Comment

0 Comments