सरकारची परराष्ट्र आणि आर्थिक नीती फेल; धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे तीव्र आंदोलन





 सरकारची परराष्ट्र आणि आर्थिक नीती फेल; धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे तीव्र आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी; महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात 'शिवतीर्था'वर घोषणाबाजी

धुळे : केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आणि अपयशी परराष्ट्र नीतीमुळे देश महागाईच्या खाईत लोटला गेला असल्याचा थेट आरोप करत आज धुळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. धुळे येथील ऐतिहासिक शिवतीर्थ चौकात पार पडलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महागाई रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.


माजी आमदार अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

हे आंदोलन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्ह्याचे संपर्क नेते तथा माजी आमदार अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शिवतीर्थ चौकात मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भगवे झेंडे व निषेधाचे फलक हातात घेऊन गोळा झाले होते. केंद्र शासनाच्या सर्वसामान्य आणि गरीब विरोधी धोरणांचा यावेळी तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.


'कथनी आणि करणीत फरक'; मोदी सरकारवर घणाघाती टीका

आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला तेल, गॅस कमी वापरा, सोने खरेदी बंद करा, परदेश दौरे करू नका असे सल्ले देतात; परंतु स्वतः मात्र मोटारींच्या प्रचंड ताफ्यात रोड शो करतात. जनतेला आवाहन केल्यानंतर लगेचच स्वतः पाच युरोपीय देशांच्या दौऱ्यावर निघून जातात. मोदी सरकारच्या या कथनी आणि करणीतील फरकामुळे आता स्वतः भाजपचे नेतेही त्यांचे आवाहन गांभीर्याने घेत नाहीत," अशी टीका आंदोलकांकडून करण्यात आली.


तसेच, ११ ते १२ वर्षांपूर्वी जेव्हा केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार होते, तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ५६ रुपये असताना आणि घरगुती गॅस सिलेंडर ४१४ रुपयांना मिळत असताना याच नेत्यांनी प्रचंड आकांडतांडव करून रान पेटवले होते, याची आठवणही यावेळी करून देण्यात आली.


परराष्ट्र नीती पूर्णपणे कोलमडली

आज रुपयाची घसरण होऊन तो प्रति डॉलर ९६ रुपयांवर पोहोचला आहे, याकडे लक्ष वेधत शिवसेना नेत्यांनी सरकारच्या परराष्ट्र नीतीवर हल्लाबोल केला. "आज आपली परराष्ट्र नीती पूर्णपणे फेल झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला एकही मित्र देश उरलेला नाही. नेपाळ, मालदीव, बांगलादेश, श्रीलंकासारखे देश आपल्याला डोळे वटारून पाहत आहेत, तर युरोपीय देश भारताला मोजत नाहीत. रशिया आणि इराणसारखे आपले सच्चे, पारंपरिक मित्र देश आपण गमावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्ष आणि देशातील अर्थतज्ज्ञ यांच्या अभ्यासाला काडीचीही किंमत देत नाहीत, ज्याची किंमत आज संपूर्ण देश आणि येथील जनता मोजत आहे," असा घणाघात यावेळी करण्यात आला.


'दरवाढ मागे घ्या, अन्यथा राजीनामा द्या'

देशावर आर्थिक संकट घोंगावत असताना मोदी सरकारने केवळ निवडणुकांना प्राधान्य दिले. निवडणुका संपताच गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज जरी इंधनात ३ रुपयांची वाढ झाली असली, तरी सरकार लोकांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहत आहे. जर आज याविरोधात आवाज उठवला नाही, तर येत्या १ ते २ महिन्यांत ही दरवाढ १८ ते २० रुपयांपर्यंत जाईल, अशी भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे आंदोलकांनी सांगितले.


प्रमुख मागण्या :

शासनाने तात्काळ इंधन दरवाढ मागे घ्यावी.

गॅस आणि इंधनावरील अतिरिक्त अधिभार (Tax) कमी करून सर्वसामान्य जनतेला, गृहहिणींना आणि गोरगरिबांना दिलासा द्यावा.

जनतेचा बळी देणे थांबवावे, अन्यथा मोदी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा.

या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे धुळे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकात झालेल्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

Post a Comment

0 Comments