सोशल मीडियावरील 'कॉकरोच जनता पार्टी' आता थेट रस्त्यावर! अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात दिल्लीत तरुणाईचा एल्गार


 सोशल मीडियावरील 'कॉकरोच जनता पार्टी' आता थेट रस्त्यावर! अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात दिल्लीत तरुणाईचा एल्गार

दिल्ली | वृत्तसेवा

सोशल मीडियाद्वारे 'मास मूव्हमेंट' (मोठी चळवळ) बनलेली कॉकरोच जनता पार्टी (CJP) आता थेट रस्त्यावर उतरली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके हे भारतात परतले असून, त्यांना दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे. आज सकाळपासूनच देशभरातून मोठ्या संख्येने तरुणाई या ठिकाणी एकवटली असून आंदोलनस्थळी एकच गर्दी झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.

दिल्लीला छावणीचे स्वरूप

आंदोलकांना सुरुवातीला परवानगी नाकारली असती, तर मोठ्या उद्रेकाची शक्यता होती. त्यामुळे ऐनवेळी या आंदोलनाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. दरम्यान, जंतरमंतर परिसरातील गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे २ हजार सुरक्षा रक्षक व पोलीस बल तैनात करण्यात आले असून दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे.

आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोशल मीडियावर दोन कोटींहून अधिक फॉलोअर्स मिळवणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'ला आतापर्यंत केवळ सोशल मीडियाचा पक्ष म्हणून हिणवले जात होते. मात्र, अभिजित दीपके यांनी अमेरिकाहून थेट भारत गाठत सत्ताधाऱ्यांना खुले आव्हान दिले आहे. आजच्या या आंदोलनात देशभरातून हजारो तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

पेपर लीक, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर विषयांवरून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर आणि सरकारवर कडक शब्दांत आसूड ओढले. दुपारी उशिरापर्यंत हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने परंतु तितक्याच आक्रमकपणे सुरूच होते.

'संविधानावर पूर्ण विश्वास' – अभिजित दीपके

भारतात परतल्यानंतर आपल्याला अटक होऊ शकते, अशी भीती अभिजित दीपके यांनी आधी व्यक्त केली होती. मात्र, "आपला भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाय ठेवताच दीपके यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक उंचावून दाखवत राज्यकर्त्यांना आणि संपूर्ण यंत्रणेला एक सूचक संदेश दिला होता, ज्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Post a Comment

0 Comments