सोशल मीडियावरील 'एक लाखाचे तीन लाख' करण्याचे आमिष महागले; मध्य प्रदेशातील शिक्षकाला लुटणारी टोळी गजाआड, आणखी तिघांना अटक

 सोशल मीडियावरील 'एक लाखाचे तीन लाख' करण्याचे आमिष महागले; मध्य प्रदेशातील शिक्षकाला लुटणारी टोळी गजाआड, आणखी तिघांना अटक


धुळे:

सोशल मीडियावर 'एक लाख रुपयांचे तीन लाख रुपये' करून देण्याचे खोटे प्रलोभन दाखवून मध्य प्रदेशातील एका शिक्षकाला धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बोलावून शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) आणि निजामपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टोळीतील आणखी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि रोख रक्कमेसह एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यापूर्वीच मुख्य आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली होती.

रील पाहून साधला होता संपर्क

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील तराना येथील रहिवासी असलेले शिक्षक अनिल उमरावसिंह बोडाणा यांनी इंस्टाग्रामवर 'एक लाखाचे तीन लाख रुपये' करून देणारी एक रील पाहिली होती. पैशांच्या आमिषापोटी बोडाणा यांनी त्या रीलवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला. संबंधित आरोपीने त्यांना व्यवहारासाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर जवळील खोरी शिवारात बोलावून घेतले.

शस्त्राचा धाक दाखवून १ लाख १४ हजार लुटले

ठरल्याप्रमाणे अनिल बोडाणा हे त्यांच्या एका मित्रासह खोरी शिवारातील पवनचक्कीच्या टॉवरजवळ पोहोचले. त्याच वेळी तिथे ६ मोटारसायकलवरून १२ ते १४ अज्ञात तरुण आले. त्यांनी बोडाणा व त्यांच्या मित्राला घेरले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या गळ्याला चाकू लावला. जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी फिर्यादींचे मोबाईल हिसकावले आणि 'फोन पे' (PhonePe) द्वारे बळजबरीने पैसे ट्रान्सफर करून घेतले. तसेच त्यांच्याकडील रोकड, चांदीची चेन आणि चार्जर असा एकूण १ लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपी फरार झाले. या धक्क्यातून सावरत पीडित शिक्षकाने थेट निजामपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक

सोशल मीडियाचा वापर करून दरोडा टाकल्याची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे साक्री तालुक्यातील भामेर येथील रहिवासी मंगेश भैय्या कढरे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मंगेशने सांगितले की, त्याचा मित्र बाळूशेठ उर्फ राकेश सजनसिंग भोसले (रा. जामदे, ता. साक्री) याने इंस्टाग्रामवर बनावट रील अपलोड केली होती. शिक्षकाने संपर्क साधल्यानंतर त्यांना खोरी गावी आणण्यात आले होते.

ऑनलाईन ट्रान्सफर आणि पैशांची विल्हेवाट

चाकूचा धाक दाखवून बाळूशेठ भोसले याने शिक्षक बोडाणा यांच्या मोबाईलवरून मंगेश कढरे याच्या फोन पे क्रमांकावर ३५ हजार आणि ७१ हजार असे एकूण १ लाख ६ हजार रुपये ट्रान्सफर केले होते. यातील ४० हजार रुपये एटीएममधून काढले गेले, तर उर्वरित ६५ हजार रुपये एका पेट्रोल पंपावर कामाला असलेल्या मुकेश भामरे याच्या खात्यावर पाठवून तिथून रोख स्वरूपात घेण्यात आले होते.

आणखी तिघे अटकेत, ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

निजामपूर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत या गुन्ह्यात आणखी तिघांना अटक केली आहे.

मुकेश प्रकाश भामरे (रा. भामेर, ता. साक्री)

जोगलेश लली चव्हाण (रा. जामदा, ता. साक्री)

नागेश नवशा चव्हाण (रा. जामदा, ता. साक्री)

अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांचे आवाहन:

"साक्री तालुक्यातील या भागातून सोशल मीडियावर वेगवेगळी प्रलोभने दाखवून फसवणूक केली जाते, अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये," असे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments