मोठी दुर्घटना : अमोनिया गळतीने घेतले सात बळी; ४० हून अधिक कामगार रुग्णालयात दाखल

 तामिळनाडूच्या


 तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरियापालयमजवळील कन्निगापैर परिसरातील एका खासगी सी-फूड प्रक्रिया आणि निर्यात कारखान्यात रविवारी अमोनिया वायूची मोठी गळती होऊन भीषण दुर्घटना घडली. या घटनेत सात महिला कामगारांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक कामगारांना उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात मोनिया वायूची गळती सुरू झाल्यावर काही क्षणांतच विषारी वायू संपूर्ण परिसरात पसरल्याने कामगारांना श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. अनेक कामगार कारखान्याच्या आतच बेशुद्ध पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली.बाधित कामगारांना तातडीने जवळील रुग्णालयांत हलविण्यात आले. गंभीर रुग्णांपैकी काहींना पुढील उपचारासाठी चेन्नईमधील विशेष रुग्णालयात पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. मृतांमध्ये बहुसंख्य महिला कामगारांचा समावेश असून त्यापैकी काही कामगार इतर राज्यांतून रोजगारासाठी तामिळनाडूत आल्याची माहिती समोर आली आहे.

दुर्घटनेनंतर प्रशासनाने कारखाना परिसर सील केला असून वायू गळतीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात निष्काळजीपणा झाला का, याचाही तपास केला जात आहे.

Post a Comment

0 Comments