अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी थेट मनपाच्या गेटला कुलूप ठोकून आंदोलन
धुळे:
जगन्नाथ नगर येथील रहिवासी ७५ वर्षीय दलित महिला मंडाबाई रघुनाथ भाले यांच्या राहत्या घराला अतिक्रमण ठरवून महापालिका प्रशासनाने ते पाडून टाकले. महापालिकेच्या या दडपशाही आणि अन्यायाविरोधात मंडाबाई भाले, त्यांचे सुपुत्र ललित भाले यांच्यासह 'दक्ष पत्रकार संघ' व 'वंचित बहुजन आघाडी'च्या वतीने १५ जूनपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने अखेर आज संतप्त आंदोलनकर्त्यांनी थेट धुळे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला (गेटला) कुलूप ठोकले या आंदोलनामुळे मनपा परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रशासनाकडून दडपशाहीचा आरोप
आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडताना प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मंडाबाई भाले या गेल्या ७० ते ८० वर्षांपासून जगन्नाथ नगर भागात वास्तव्यास आहेत. असे असतानाही मनपा आयुक्त नितीन कापडणीस, अतिक्रमण निर्मूलन पथक व सहायक आयुक्त किशोर शिंदे यांनी आकसबुद्धीने त्यांचे घर तोडून मालमत्तेचे मोठे नुकसान केले. तसेच त्यांना मानसिक त्रास देऊन अश्लील शब्दांत त्यांचा अपमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या अन्यायाविरोधात मंडाबाई व त्यांचा मुलगा ललित यांनी ९ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले होते. परंतु, मनपा आयुक्तांनी पोलिसांच्या मदतीने त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी त्यांना बळजबरीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केले. यानंतर पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी देवपूर पोलीस ठाणे तसेच महापालिकेकडे दाद मागण्यात आली, मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.
'धनाढ्यांना अभय, गरिबांवर अन्याय'
"एकीकडे दलित समाजाच्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेचे घर पाडून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, तर दुसरीकडे शहरातील धनदांडग्या अतिक्रमणधारकांना अभय दिले जात आहे. हा भेदभाव का?" असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. न्याय मिळत नसल्यानेच 'महापालिका गेट बंद आंदोलन' करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे संघटक शंकर अण्णा खरात व दक्ष पत्रकार संघ नागसेन बागुल यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराला ताळे ठोकले



0 Comments