मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात अनुसूचित जातींचा विराट महामोर्चा; विविध समाजघटकांची अभूतपूर्व एकजूट
मुंबई, प्रतिनिधी : अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात मुंबईत आज हजारोंच्या संख्येने नागरिकांचा विराट महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शविला.
मोर्चात बौद्ध समाजासह चर्मकार, ढोर, होलार, हिंदू खाटीक, कक्कया, भंगी, मेहतर, डक्कलवार तसेच दक्षिण भारतातील माला समाजातील हजारो महिला-पुरुष सहभागी झाले होते. आयोजकांच्या मते, अनुसूचित जातीतील विविध घटकांचे असे व्यापक ऐक्य महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पाहायला मिळाले.
मोर्चाच्या नेतृत्वात आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, अमन आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार ज्योती गायकवाड, माजी आमदार राम पंडागळे, बाबुराव माने, एस. के. भंडारे, अरुण गाडे, सुरेश माने, सागर संसारे, अशोक कांबळे, विश्वदीप करंजीकर, बलराज दाभाडे, मनोज गायकवाड, आशिष गाडे, स्मिता कांबळे, ॲड. गुणरत्न सदावर्ते, ॲड. जयश्री पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि भिक्खू संघ उपस्थित होता.
महामोर्चाचे एक टोक मेट्रो सिनेमा परिसरात तर दुसरे टोक
बृहन्मुं
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) मुख्यालयापर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले. मोर्चादरम्यान मुसळधार पाऊस सुरू असूनही सहभागींची संख्या कायम राहिली.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात नियोजन केले. तसेच शिस्तबद्ध आयोजनासाठी अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचेही उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
या मोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमधील आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून, सामाजिक ऐक्य कायम ठेवण्याचा निर्धार सहभागी नागरिकांनी व्यक्त केला.





0 Comments