खासदारांच्या सुरक्षेवरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात; "शेतकऱ्यांना अटी, गद्दारांना Y+ सुरक्षा"

 खासदारांच्या सुरक्षेवरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात; "शेतकऱ्यांना अटी, गद्दारांना Y+ सुरक्षा"


 रोहित पवार यांनी राज्य सरकारवर शेतकरी कर्जमाफी आणि Y+ सुरक्षा व्यवस्थेवरून जोरदार टीका केली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अटी लावत असून गद्दारांना सुरक्षा देत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये, "शेतकरी कर्जमाफीवर जाचक अटी लावणारे सरकार खोक्यांच्या जोरावर गद्दारी करणाऱ्यांना मात्र जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा देते," असा आरोप केला. तसेच "वाह रे सरकार तेरा खेल, किसानों को लगा दिया तेल और गद्दारों को बाँट रहा है झालमुरी भेल," अशा शब्दांत त्यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली.

पवार यांनी पुढे म्हटले की, शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने अनेक अटी-शर्ती घातल्या आहेत. मात्र दुसरीकडे जनतेच्या पैशातून काही लोकांना विशेष सुरक्षा पुरवली जात आहे. यामुळे सरकार नेमका कोणता संदेश देऊ इच्छित आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे शेतकरी कर्जमाफीतील अटी हटविण्याच्या मागणीवर आक्रमक भूमिका घेत असून त्यांनी यासाठी पंढरपुरात उपोषणही केले होते. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी मिळावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे आणि गद्दारी करणाऱ्यांना संरक्षण देणारे हे उलट्या काळजाचे, निर्दयी आणि लबाड सरकार आहे," असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.

दरम्यान, रोहित पवार यांच्या या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असून, सत्ताधारी महायुतीकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments