टीईटी परीक्षा कायमस्वरूपी रद्द करा; पेपरफुटी नीट परीक्षा पेपर फुटी, शिक्षक भरतीतील आर्थिक गैरव्यवहार व शालार्थ आयडी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी


 टीईटी परीक्षा कायमस्वरूपी रद्द करा; पेपरफुटी, शिक्षक भरतीतील आर्थिक गैरव्यवहार व शालार्थ आयडी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी






धुळे | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, टीईटी परीक्षा कायमस्वरूपी रद्द करून सरळ सेवा भरतीद्वारे शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सलग तीन ते चार वर्षांपासून टीईटी पेपरफुटीच्या घटना घडत असल्याने विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक व शैक्षणिक त्रास सहन करावा लागत आहे. परीक्षा शुल्क, प्रवास, निवास व इतर खर्चाचा मोठा आर्थिक बोजा उमेदवारांवर पडत असून वारंवार परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य निर्माण होत आहे.

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असून, काही ठिकाणी शिक्षक पदासाठी ३० ते ४० लाख रुपयांची मागणी केल्याचे आरोपही निवेदनात करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, शालार्थ आयडी घोटाळा आणि हजारो बोगस शिक्षक भरती प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

मुख्य मागण्या :

टीईटी परीक्षा कायमस्वरूपी रद्द करावी.

सरळ सेवा भरतीद्वारे शिक्षकांची नियुक्ती करावी.

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय अथवा स्वतंत्र चौकशी करावी.

पेपरफुटीतील रॅकेट, दलाल व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

शिक्षक भरतीतील कथित ३० ते ४० लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी.

शालार्थ आयडी घोटाळा व बोगस शिक्षक भरतीची राज्यस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

भविष्यातील सर्व भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त करावी.

विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित  सामाजिक कार्यकर्ते कुणाल वाघ , ॲड नितीन म्हसदे , ॲड राजेंद्र चितळकर ॲड प्रवीण मोरे , ,बंटी  वाघ ,गोविंदा  अहिरे , ,उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments