आषाढी वारीसाठी ५,५०० विशेष बसेस सोडणार; ग्रुप बुकिंग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार

 


मुंबई : आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून वारीकाळात ५ हजार ५०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस उपलब्ध होईल.

राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बससेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’अंतर्गत मोफत प्रवास, तर महिलांना ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. भाविकांना जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करता येईल.

एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच पंढरपूर व परिसरात चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments