नंदुरबार जिल्ह्यात ४०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा, शासकीय वसतिगृहातील प्रकार

 नंदुरबार जिल्ह्यात ४०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा, शासकीय वसतिगृहातील प्रकार


Nandurbar Shahada Food Poisoning: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात रविवारी रात्री अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली. रात्रीच्या जेवणानंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्या होऊ लागल्या. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एकच खळबळ उडाली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

रविवारी सायंकाळी वसतिगृहातील २१७ हून अधिक विद्यार्थ्यांनी जेवण केले. जेवणात शेवग्याची भाजी, भात आणि पोळ्या देण्यात आल्या होत्या. जेवण सुरू झाल्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होऊ लागली. काही विद्यार्थी जागीच कोसळल्याने वसतिगृहात धावपळ उडाली. त्यानंतर बाधित विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका तसेच विविध वाहनांतून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. देविदास बाशिंगे (रा. ओसर्ली), पार्थ धिवरे, आदित्य सूर्यवंशी, पंकज कुवर, प्रदीप (पूर्ण नाव उपलब्ध नाही) आणि मनोहर पाटील या सहा विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांचे प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. मुलांची प्रकृती पाहून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पालकांनी वसतिगृह प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत मुख्याध्यापक आणि वॉर्डन यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप केला. दरम्यान, विद्यार्थ्यांनीही वसतिगृहात नेहमीच निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे तसेच तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना दमदाटी केली जात असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, प्रांताधिकारी दीपक गिरासे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी जेवणाचे तसेच उलट्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पालकांशी संवाद साधून वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी समिती स्थापन करून महिनाभरात आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. या घटनेमुळे समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांतील अन्नाची गुणवत्ता, देखरेख आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांंकडून याआधीही तक्रार

“आम्ही अनेक वेळा निकृष्ट जेवणाबाबत तक्रार केली होती. मात्र, व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. रविवारी रात्री जेवण सुरू केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी पहिला घास घेताच मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. काही विद्यार्थी खाली कोसळले. त्यानंतर इतरांनाही तोच त्रास झाला. ज्या विद्यार्थ्यांनी जेवण केले नव्हते, त्यांना कोणताही त्रास झाला नाही,” अशी माहिती उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या मते, आरडाओरडा ऐकून नागरिक धावून आले. त्यानंतरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Post a Comment

0 Comments