चिखलीतील बौद्ध महिलेवरील हल्ल्याप्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेची आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेळगाव जहांगीर येथे एका बौद्ध महिलेवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित महिलेची भेट घेत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, महिलेवर लोखंडी रॉडने गंभीर मारहाण करण्यात आली असून तिच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे.. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी असा आरोप केला आहे की, घटनेनंतर चार दिवस उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही. तसेच यापूर्वी 26 जून 2026 रोजी दिलेल्या तक्रारीनंतरही योग्य कारवाई झाली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.
या प्रकरणाची अनुसूचित जाती आयोग, राज्य सरकार आणि गृह विभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. आरोपींना त्वरित अटक न झाल्यास बुलढाण्यासह महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.


0 Comments