धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरातील बौद्ध वस्ती संदर्भात नागरिकांची जाहीर बैठक संपन्न
धुळे, प्रतिनिधी :
धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरातील गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बौद्ध वस्तींना अतिक्रमण घोषित करून वारंवार नोटिसा देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांची जाहीर बैठक पार पडली. ही बैठक संदेश भूमी, धुळे बसस्टँड जवळ येथे आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे सांगितले. अचानक अतिक्रमणाची कारवाई करून रहिवाशांना बेघर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
समाजातील ज्येष्ठ नेते, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान नागरिकांनी एकजूट दाखवत आपल्या हक्कांसाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून प्रश्न सोडवावा, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी विविध वक्त्यांनी रहिवाशांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित राहण्याचे आवाहन केले. पुढील आंदोलनाची दिशा, निवेदन देणे तसेच कायदेशीर लढाईबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीचे आयोजन स्टेशन रोड नागरिक व समस्त धुळे शहर आंबेडकरी समाज यांच्या वतीने करण्यात आले होते.



0 Comments