ठाण्यात रिपब्लिकन युवक नेते अशोक कांबळे यांची हत्या; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र निषेध व्यक्त केला
मुंबई, दि. 20 — रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर जिल्हा युवक कमिटीचे सरचिटणीस अशोक कांबळे यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी तीव्र संताप व्यक्त करत घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला आहे.
अशोक कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दिवंगत अशोक कांबळे हे रिपब्लिकन पक्षाचे सक्रिय युवा कार्यकर्ते होते. ठाण्यातील रामनगर परिसरात त्यांनी सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीमध्ये मोठे योगदान दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह विविध सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या कार्यामुळे परिसरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती.
या हत्येमुळे रिपब्लिकन पक्षात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या वतीने दिवंगत अशोक कांबळे यांना जाहीर श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले लवकरच कांबळे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
— हेमंत रणपिसे
प्रसिद्धीप्रमुख

0 Comments