भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोलीस चौकी उभारण्याची मागणी; महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेचे धुळे पोलीस अधीक्षकांना निवेदन

 भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोलीस चौकी उभारण्याची मागणी; महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेचे धुळे पोलीस अधीक्षकांना निवेदन


धुळे:

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सर्वोपचार रुग्णालय) परिसर आणि हॉस्टेल परिसरातील वाढती चोरी व सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, येथे तात्काळ पोलीस चौकी उभारण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटना मंत्रालय, मुंबई’च्या वतीने धुळे जिल्ह्याचे  पोलीस अधीक्षक विशाल आनंद शिंगूरी साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावर पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य ती कारवाई करण्याचे ठोस आश्वासन संघटनेला दिले आहे.

सुरक्षेचा प्रश्न गंभीर; २४ तास असते रुग्णांची गर्दी

हिरे शासकीय रुग्णालयात धुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून व ग्रामीण भागातून दररोज सरासरी ४०० ते ५०० रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. तसेच बाह्यरुग्ण विभागात (OPD) दररोज ८०० ते ९०० रुग्णांची तपासणी होते. या संस्थेत अंदाजे १००० ते १५०० कर्मचारी कार्यरत असून, वैद्यकीय व नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींची वसतिगृहे (हॉस्टेल्स) देखील याच परिसरात आहेत. त्यामुळे येथे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांची २४ तास मोठी वर्दळ असते.

चोऱ्यांचे प्रमाण वाढले; कर्मचाऱ्यांना लुटमारीची भीती

या गर्दीचा फायदा घेऊन रुग्णालयाच्या परिसरातून नागरिक व कर्मचाऱ्यांचे मोबाईल, दागिने, पैसे आणि वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत चिंतेची बाब म्हणजे, रात्रीच्या वेळी कर्तव्यावर (ड्युटी) ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंधाराचा फायदा घेऊन लुटण्याचे प्रकारही घडले आहेत.

संघटनेने निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या केल्या आहेत:

रुग्णालयाच्या आवारात सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्यात यावी.

कर्मचाऱ्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षेसाठी रोज संध्याकाळी ७:०० ते रात्री १०:०० या वेळेत रुग्णालय व हॉस्टेल परिसरात पोलीस गाडीची (पेट्रोलिंग) गस्त सुरू करण्यात यावी, जेणेकरून लुटमारीच्या घटनांना आळा बसेल.

पोलीस अधीक्षकांचे ठोस आश्वासन

निवेदन स्वीकारल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद शिंगूरी यांनी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष . गिरीशभाऊ चौधरी यांच्याशी चर्चा केली व या निवेदनावर अत्यंत गांभीर्याने आणि लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून पोलीस चौकीबाबत पावले उचलली जातील, असे ठोस आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती

हे निवेदन देताना संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष  राहुल वाघ, धुळे जिल्हा उपाध्यक्ष विजय बाविस्कर, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष गोकुळ पाटील, धुळे जिल्हा खजिनदार  संजू खैरनार, सहखजिनदार. रामदास गोयर, जिल्हा शहर उपाध्यक्ष . राधेश्याम देसाई, धुळे शहर संघटक  किशोर मोरे,शाबार शहा यांच्यासह रुग्णालयातील इतर कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments