नंदुरबार जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी विशेष तपासणी व साहित्य वाटप शिबिरांचे आयोजन; २७०० नागरिकांना मिळणार लाभ

 नंदुरबार जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी विशेष तपासणी व साहित्य वाटप शिबिरांचे आयोजन; २७०० नागरिकांना मिळणार लाभ


नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या आरोग्य तपासणीसाठी आणि त्यांना आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांद्वारे जिल्ह्यातील सुमारे २७०० दिव्यांग नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल आणि त्यांना गरजेनुसार कृत्रिम अवयव व इतर साहित्य मोफत दिले जाणार आहे. या संदर्भातील माहिती गटविकास अधिकारी देविदास देवरे यांनी दिली.

हा स्तुत्य उपक्रम जिल्हा समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग समन्वय विभाग, तसेच जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. यासाठी 'श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती' आणि 'जयपूर फूट, दिल्ली' यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तालुका पातळीवर हे कॅम्प आयोजित केले जाणार असून, ग्रामपंचायत स्तरावरून लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. दिव्यांग नागरिकांचे जीवन अधिक सुलभ व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

तालुकानिहाय शिबिरांचे सविस्तर वेळापत्रक:

सर्व शिबिरांची वेळ सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत असेल.

नंदुरबार: ३० व ३१ मे २०२६ | स्थळ: एस. ए. मिशन हायस्कूल हॉल, नंदुरबार.

तळोदा: २ व ३ जून २०२६ | स्थळ: श्री जैन मंदिर, गणपती रोड, तळोदा.

नवापूर: ५ व ६ जून २०२६ | स्थळ: अग्रवाल समाज मंदिर, विसरवाडी रोड, नवापूर आणि नगरपालिका टाऊन हॉल, नवापूर.

अक्कलकुवा: ८ व ९ जून २०२६ | स्थळ: जैन मंदिर, खटवाणी रोड, अक्कलकुवा.

अक्राणी: ११ व १२ जून २०२६ | स्थळ: एस. व्ही. ठाकर कॉलेज, बाजार स्टँडजवळ, अक्राणी.

शहादा: १४ व १५ जून २०२६ | स्थळ: हॉटेल जैन प्लाझा, शहादा.

प्रशासनाचे आवाहन

या शिबिरांमध्ये दिव्यांगांची तपासणी करून त्यांना आवश्यक कृत्रिम अवयव, सहाय्यक उपकरणे व अन्य साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच या मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी संबंधित गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि पंचायत समिती प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments