बहुजन हक्क परिषद: शिक्षण भांडवलदारांच्या दावणीला; वणीमध्ये सुजात आंबेडकरांचा सरकारवर घणाघात
वणी: वंचित बहुजन आघाडी दिंडोरी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 'बहुजन हक्क निर्धार परिषद' शुक्रवारी (दि. १५) येथील खुशी बँक्वेट हॉलमध्ये प्रचंड उत्साहात पार पडली. या परिषदेत बोलताना वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.
शिक्षण क्षेत्रातील वाढते खाजगीकरण हा गरिबांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न असून, सरकारने शिक्षण भांडवलदारांच्या दावणीला बांधल्याचा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी यावेळी केला.
'शिक्षण हा सर्वसामान्यांचा मूलभूत अधिकार'
परिषदेत सामाजिक न्याय, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि संघटनात्मक बांधणी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सुजात आंबेडकर पुढे म्हणाले की, "शिक्षण हा सर्वसामान्यांचा मूलभूत अधिकार आहे. बहुजन समाजाने आता संघटित होऊन आपली सामाजिक व राजकीय ताकद वाढवण्याची गरज आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर संघटन मजबूत करून संविधानिक मूल्यांवर आधारित नवे राजकारण उभे करावे."
सरकारची धोरणे विशिष्ट समाजासाठी घातक: दिशा पिंकी शेख
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांनी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक विषमता या मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. "सरकारची धोरणे आदिवासी, मुस्लिम, बौद्ध आणि ओबीसी समाजासाठी घातक ठरत आहेत," असा आरोप करत त्यांनी महिलांनी या राजकीय चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
स्थानिक प्रश्नांवरून प्रशासनावर नाराजी
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी स्थानिक प्रश्नांवर भाष्य करत प्रशासकीय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तर युवा आघाडीचे जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे यांनी परिषदेची भूमिका स्पष्ट करत सामाजिक न्यायाची लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
ही परिषद यशस्वी करण्यासाठी दिंडोरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेजवळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत अहिरे, युवा महासचिव विकी दुधवळे, शहराध्यक्ष तुषार मोरे, उपाध्यक्ष संकेत गांगुर्डे आदींसह वंचित बहुजन आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिषदेला परिसरातील नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली होती.




0 Comments