महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य; अवैध धंद्यांचा बिमोड करणार – नूतन एसपी विशाल आनंद

 महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य; अवैध धंद्यांचा बिमोड करणार – नूतन एसपी विशाल आनंद


धुळे | प्रतिनिधी

धुळे जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी १२ कलमी कार्यक्रम जाहीर केला. महिला व बालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अवैध धंदे, गुन्हेगारी आणि सामाजिक शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात कम्युनिटी पोलिसिंगला अधिक बळ देण्यात येणार असून नागरिक आणि पोलिस यांच्यातील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. महिलांच्या सुरक्षेसाठी शाळा, महाविद्यालय परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष पथके तैनात करण्यात येतील.

तसेच अवैध मद्यविक्री, जुगार, मटका, गांजा आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केली जाईल. गुन्हेगारांवर कठोर नजर ठेवून जिल्ह्यात शांतता राखण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा मजबूत करण्यात येणार असून नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक ताणतणाव कमी करण्यासाठीही विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments