'झुरळ' नाव अजब असले तरी तरुणाई पाठीशी; 'कॉकरोच जनता पार्टी'ला अण्णा हजारेंचा जाहीर पाठिंबा!
अहिल्यानगर:
सोशल मीडियावर अल्पावधीत तुफान लोकप्रिय झालेली आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना थेट आव्हान देऊ पाहणारी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. या आभासी चळवळीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि संकेतस्थळांमार्फत बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या चळवळीला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. "नाव जरी अजब असले, तरी या पक्षाच्या मागे देशातील तरुण उभा राहिला आहे, हे महत्त्वाचे आहे," अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीतून झाली सुरुवात
'कॉकरोच जनता पार्टी' ही एक उपहासात्मक ऑनलाइन मोहीम आहे. १५ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील दर्जा मिळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी, "झुरळांसारखे असे तरुण आहेत, ज्यांना या व्यवसायात रोजगार मिळत नाहीये. यापैकी काही मीडिया, काही सोशल मीडिया आणि काही RTI व इतर प्रकारचे कार्यकर्ते बनत आहेत. हे प्रत्येकजणावर हल्ला करायला सुरुवात करतात," अशी टिप्पणी केली होती. या वक्तव्यानंतरच सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' या मोहिमेचा उगम झाला आणि तिने एका मोठ्या आंदोलनाचे रूप घेतले.
नेमके काय म्हणाले अण्णा हजारे?
लोकपाल आंदोलनाचे जनक अण्णा हजारे यांनी या मोहिमेची दखल घेत सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले:
"झुरळ हे नाव कदाचित ऐकायला योग्य वाटणार नाही, पण या पार्टीचा मूळ उद्देश समजून घेणे गरजेचे आहे. नाव काहीही असले तरी देशातील तरुण या पार्टीच्या पाठीशी मोठ्या संख्येने उभा आहे. युवाशक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती असते. जेव्हा या दोन्ही शक्तींचा प्रामाणिक संगम होतो, तेव्हा सरकारने त्यांचा अव्हेर न करता त्यांना योग्य प्रोत्साहन दिले पाहिजे."
बंदीनंतर 'सीजेपी'ची पुन्हा उभारी
गेल्या काही दिवसांत 'कॉकरोच जनता पार्टी'चे 'X' (ट्विटर) आणि 'इन्स्टाग्राम' अकाउंट्स, तसेच १० लाख नोंदणी झालेले त्यांचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) प्रशासनाकडून बंद करण्यात आले होते. यंत्रणांनी दिलेल्या या मोठ्या झटक्यानंतरही सीजेपीने हार मानलेली नाही. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी 'X' वर पोस्ट करत माहिती दिली की, त्यांनी त्यांचे इन्स्टाग्राम खाते पुन्हा मिळवले असून, पक्ष नव्या दमाने आणि जोशाने कामाला लागला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थापक दीपके यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त
दरम्यान, या आभासी पक्षामुळे आणि वाढत्या लोकप्रियतेमुळे चर्चेत आलेले संस्थापक अभिजित दीपके यांना अज्ञात व्यक्तींकडून धमक्या आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस प्रशासन तातडीने सतर्क झाले आहे. सिडको वाळूज महानगर-१ येथील दीपके यांच्या पालकांच्या घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून दोन अधिकारी आणि २२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.

0 Comments