लग्न ठरत नसल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईला जिवंत जाळले; उपचारादरम्यान वृद्धेचा मृत्यू, धुळे तालुक्यातील खळबळजनक घटना
धुळे: ग्रामीण भागात तरुणांची लग्ने न जमण्याची समस्या किती गंभीर आणि भीषण स्वरूप धारण करत आहे, याचा एक सुन्न करणारा प्रकार धुळे तालुक्यातून समोर आला आहे. "माझे लग्न का लावून देत नाही?" असा जाब विचारत एका ४५ वर्षीय मुलाने आपल्या ६५ वर्षीय जन्मदात्या आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत गंभीर भाजलेल्या वृद्ध मातेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिजाबाई भटू खैरनार-पाटील (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी आरोपी मुलाला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
आईच लग्न लावून देत नसल्याचा होता संशय
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील महिंदळे येथे ही हृदयद्रावक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील (वय ४५) याला अटक केली आहे. संशयित आरोपी प्रदीप हा व्यवसायाने रिक्षाचालक आहे. त्याचे लग्न जमण्यात अनेक अडचणी येत होत्या. आपली आईच आपले लग्न लावून देत नाही, असा संशय प्रदीपच्या मनात घर करून होता. याच संशयातून त्याच्या मनात आईविषयी तीव्र संताप आणि आकस निर्माण झाला होता. यावरूनच गेल्या काही दिवसांपासून माय-लेकामध्ये वारंवार खटके उडत होते.
मध्यरात्री दारूच्या नशेत घातला वाद
शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जिजाबाई या आपल्या घराच्या अंगणात मुलगा प्रदीप याची वाट पाहत बसल्या होत्या. त्याचवेळी प्रदीप हा मद्याधुंद अवस्थेत घरी आला. घरी येताच त्याने आईशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. "माझे लग्न का लावून देत नाही?" असा जाब विचारत त्याने वाद विकोपाला नेला.
रागाच्या भरात प्रदीपने घरातील ज्वलनशील पदार्थ आणून थेट आई जिजाबाई यांच्या अंगावर ओतले आणि त्यांना पेटवून दिले. आगीच्या ज्वालांनी वेढलेल्या जिजाबाई यांनी वाचवण्यासाठी आरडाओरड केली. त्यांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिक जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत जिजाबाई या गंभीररीत्या भाजल्या गेल्या होत्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी प्रदीप खैरनार याला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.
महिंदळे गावावर शोककळा; वाढत्या मानसिक तणावावर चिंता
आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या अमानुष घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महिंदळे गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे व आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
एकीकडे ग्रामीण भागात लग्न न जमल्यामुळे तरुणांमध्ये वाढणारा मानसिक तणाव आणि दुसरीकडे त्याला मिळणारी मद्याची जोड, यातून अशा हिंसक घटना घडत असल्याबद्दल समाजमन आणि तज्ज्ञांकडून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

0 Comments