भोरमधील चिमुकली अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; सरकार कठोर कारवाईच्या तयारीत

 सम्राट ब्रेकिंग न्यूज

भोरमधील चिमुकली अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; सरकार कठोर कारवाईच्या तयारीत


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नंदनवन शासकीय निवासस्थानी भोर-नसरापूर येथील ग्रामस्थांची भेट घेतली. गावात घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेतील आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित आरोपीला फाशीची शिक्षाच योग्य असल्याचे स्पष्ट केले. “या प्रकरणात सरकार कोणतीही दिरंगाई करणार नाही. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी सांगितले.

या घटनेबाबत आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत चर्चा झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांनी पोलीस प्रशासनाला न्यायवैद्यक पुरावे आणि इतर सर्व पुरावे काटेकोरपणे गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आरोपीवर कठोर कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आरोपीला वय किंवा मानसिक आजाराचे कारण पुढे करून कोणतीही पळवाट मिळू नये, याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे   यांनी नमूद केले. या खटल्यासाठी पुण्यातील निष्णात सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येणार असून, फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत दैनंदिन सुनावणी घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले.

दरम्यान, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडून या प्रकरणाचा दररोज आढावा घेतला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा, यासाठी सरकार गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार दिलीप लांडे हे देखील उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments