पत्नीसमोर अपमान केल्याचा राग; पोटच्या मुलानेच केला आई-वडिलांचा निर्घृण खून
शिरपूर (धुळे): आपण काहीच काम धंदा करत नसल्याने आई-वडील पत्नीसमोर टोचून बोलतात आणि अपमान करतात, याच रागातून एका २४ वर्षीय मुलाने आपल्या पोटच्या आई-वडिलांची डोक्यात लोखंडी बत्ता घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरपूर शहरात घडली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शिरपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शिरपूर शहरातील महावीर विहार भागात शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. रणजुदेवी महतो (वय ४३) आणि गंगा झिरीलाल महतो (वय ४९) अशी मृत आई-वडिलांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा चंदन महतो (वय २४) याला घरमालकाच्या फिर्यादीवरून तात्काळ अटक केली आहे.
झोपेतच केला प्राणघातक हल्ला
आरोपी चंदन हा कोणताही कामधंदा करत नसल्याने त्याचे आई-वडील त्याला नेहमी बोलत असत. शुक्रवारी दुपारी आई-वडील घरात झोपलेले असताना, पत्नीसमोर नेहमी होणाऱ्या अपमानाचा राग मनात धरून चंदनने मसाला कुटण्याच्या लोखंडी बत्त्याने दोघांच्याही डोक्यावर झोपेतच सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले.
खून केल्यानंतर घरमालकाकडे मागितली मदत
दोघांना गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी चंदन दुपारी दीड वाजेच्या सुमारास रक्ताने माखलेल्या हाताने आणि कपड्यांनी घराबाहेर आला. त्याने घरमालक सैनी यांच्याकडे जाऊन "आई-वडिलांशी भांडण झाले आहे, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत करा," अशी विनवणी केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला आणि अर्ध्या तासाने काही लोकांना सोबत घेऊन परत आला.
स्थानिक नागरिकांच्या आणि इतर चार जणांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या रणजुदेवी आणि गंगा महतो यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी अंती दोघांनाही मृत घोषित केले.
पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपीने दिली कबुली
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घरमालकाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलगा चंदन महतो याला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत, "मी काहीच काम करत नसल्याने आई-वडील पत्नीसमोर नेहमी टोचून बोलायचे, याच रागातून मी हे कृत्य केले," अशी कबुली आरोपी चंदनने दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

0 Comments