धुळ्यात एम.डी. तस्कराच्या मुसक्या आवळल्या! आझाद नगर पोलिसांची मोठी कारवाई; पावणे दोन लाखांचा साठा जप्त
धुळे:
मानवी मेंदूवर गंभीर परिणाम करणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात धुळ्यातील आझाद नगर पोलिसांनी एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. शहरात एम.डी. (मेफेड्रोन) पावडरची तस्करी करणाऱ्या एका सराईत तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून सुमारे पावणे दोन लाख रुपये किमतीचा साडेआठ ग्रॅम अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचा सापळा
शहरातील पारोळा रोड परिसरात जळगाव येथून एक इसम अमली पदार्थाचा साठा घेऊन येत असल्याची अत्यंत गोपनीय माहिती आझाद नगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी रात्री पारोळा चौफुली परिसरात कडक नाकेबंदी करून सापळा रचला.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास एक संशयित व्यक्ती चौफुली जवळ धुळे रस्त्यावर येताना पोलिसांना दिसली. हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली.८ ग्रॅम ४०० मिली एम.डी. पावडर जप्त
संशयिताची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून ४ लहान-मोठ्या आकाराच्या पारदर्शक प्लास्टिकच्या पाऊचमध्ये क्रिस्टल स्वरूपातील एम.डी. (मेफेड्रोन) नावाचे पावडर आढळून आले. या पाऊचवर लाल रंगाचे ए-१, ए-२, ए-३, ए-४ असे क्रमांक लिहिलेले होते. जप्त करण्यात आलेल्या या पावडरचे एकूण वजन ८ ग्रॅम ४०० मिली असून, बाजारभावानुसार (२० हजार रुपये प्रति ग्रॅम प्रमाणे) याची किंमत सुमारे पावणे दोन लाख रुपये आहे.आरोपीचे नाव आणि गुन्हा दाखल
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी केली असता, त्याने आपले नाव रईस खान असगर खान पठाण (रा. मनोहर टॉकीज मागे, दिलदार नगर परिसर, धुळे) असे सांगितले. तो मूळचा शहरातील बारापत्थर चौकात गॅरेज चालवणारा एक उत्कृष्ट वाहन मेकॅनिक असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ) गौतम सपकाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी रईस खान याच्याविरोधात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय समाधान सुरवाडे करत आहेत.तस्करीच्या साखळीत आणखी कोण कोण? पोलिसांचा तपास सुरू
रईस पठाण याच्या अटकेनंतर आता पोलीस या तस्करीच्या मुख्य मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. एम.डी. तस्करीच्या या रॅकेटमध्ये रईस हा कोणामार्फत आला? त्याचा मुख्य जोडीदार कोण आहे? आणि या मागे त्याला कोणाचे राजकीय पाठबळ तर नाही ना? या सर्व बाजूंचा तपास आता आझाद नगर पोलिसांना करावा लागणार आहे.
भूतकाळातील कारवाया:यापूर्वीही धुळे शहरालगतच्या चाळीसगाव रोड चौफुली परिसरात काही वर्षांपूर्वी थेट आयजी पथकाने मोठी कारवाई करून एम.डी. पावडरचा साठा हस्तगत केला होता. तसेच एलसीबी (LCB) च्या पथकानेही मोठी कारवाई करत शहरातील तस्करी रोखण्यात यश मिळवले होते. त्यानंतर झालेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.
चौकट: एमडी म्हणजे काय? (माहिती)
एम.डी. (मेफेड्रोन) हा एक मानवनिर्मित (कृत्रिम) अत्यंत धोकादायक अमली पदार्थ आहे. तो थेट मानवी मेंदूवर परिणाम करतो, ज्यामुळे तात्पुरता उत्साह, ऊर्जा वाढल्याची किंवा आनंदाची खोटी भावना निर्माण होते. मात्र, याचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आहेत.
शारीरिक दुष्परिणाम: हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढणे, निर्जलीकरण (Dehydration), निद्रानाश, अस्वस्थता, भीती आणि नैराश्य येणे.
दीर्घकालीन परिणाम: याच्या सततच्या वापरामुळे व्यक्तीला याचे मानसिक व शारीरिक व्यसन जडते. काही गंभीर प्रकरणांमध्ये मेंदू, हृदय आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना कायमची हानी पोहोचू शकते.

0 Comments