धुळे: अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे पदभार हाती घेतल्यापासून पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यात भेसळ करणारे तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध त्यांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या या धडक मोहिमेमुळे एरवी कारवाईसाठी टाळाटाळ करणारी अन्न व औषध प्रशासनाची सर्वच यंत्रणा आता संपूर्ण राज्यात सतर्क झाली आहे.
याचाच भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभाग देखील सतर्क झाला असून, जिल्ह्यात एका मोठ्या कारवाईत तब्बल 5.08 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
साक्री तालुक्यातील शिरसोळे येथे छापा
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिरसोळे येथील 'गुरुकृपा किराणा गोदामावर' अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान विक्रीसाठी साठवून ठेवलेला आणि महाराष्ट्र राज्यात पूर्णपणे प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू, पाटीदार तंबाखू आदी तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. पथकाने कारवाई करत एकूण ५ लाख ८ हजार ७४० रुपये किमतीचा हा सर्व प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे.
गोदाम मालकावर गुन्हा दाखल
या बेकायदेशीर साठवणुकीप्रकरणी गोदाम मालक निलेश दत्तात्रय खैरनार याच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरनार याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३०(२)(ए), २६(२)(आय), २६(२)(आयव्ही), २७(३)(डी), २७(३)(ई), ३(१)(झेड झेड)(व्ही) व ५९ अन्वेये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या अधिकाऱ्यांच्या पथकाने केली कारवाई
अन्न आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ए. बी. पवार, एस. बी. राणे तसेच गो. व्ही. महोरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.
FDA प्रशासनाचा इशारा: प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यापुढेही अशाच प्रकारच्या कडक कारवाया भविष्यातही सातत्याने सुरू राहणार आहेत.

0 Comments